दोघांची प्रकृती गंभीर अन झाडाला सलाईन , पारनेर पोलीस स्टेशन समोर दहावा दिवस

शेअर करा

पारनेर तालुका पोलीस स्टेशन समोर 29 तारखेपासून चार कुटुंबीयांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली असून निघोज देखील सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी न्यायालयाने आदेश केल्यानंतर देखील दिलेल्या नाहीत म्हणून उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. संबंधित आरोपी व्यक्तीवर एकतर एमपीआयडी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा अन्यथा आमच्या ठेवी परत करा अशी त्यांची मुख्य मागणी असून आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे . संबंधित कुटुंबीयांची प्रकृती देखील खालावलेली असून त्यांच्यावर आता शासकीय यंत्रणेमार्फत रोज तपासणी व उपचार सुरु आहेत. नगर चौफेर प्रतिनिधीने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतलेली आहे. 

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील किसनराव वराळ पाटील पतसंस्थेमध्ये एक वर्षांसाठी सोळा लाखांची ठेव ठेवण्यात आली मात्र मुदत उलटूनही आत्तापर्यंत एक रुपयाही ठेवीदार यांना मिळालेला नाही.  2014 मध्ये कोर्टाने आदेश केल्यानंतर देखील दहा वर्षे उलटली तरी ठेवीदारांना ठेवीची रक्कम मिळाली नसल्याकारणाने पारनेर पोलीस स्टेशन समोर 29 जानेवारीपासून चार कुटुंबीयांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. एकतर आमच्या ठेवीची रक्कम आम्हाला द्या नाहीतर संस्थेचे चेअरमन आणि संचालक तसेच शाखाधिकारी यांच्यावर एमपीआयडी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा , अशी उपोषणकर्त्या व्यक्तींची मागणी आहे . उपोषण करणाऱ्या व्यक्तींपैकी दोन जणांची प्रकृती खालावली असून एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे तर निवृत्ती पळसकर यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिल्याने पारनेर पोलीस स्टेशन समोरच त्यांना सलाईन लावत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

नगर चौफेर प्रतिनिधीने पारनेर पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात बोलणे केले त्यावेळी अधिकाऱ्यांनी , ‘ एमपीआयडी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला सहकार विभागाचे पत्र गरजेचे असते जे देण्यात आलेले नाही त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास आम्ही असमर्थ आहोत आणि ठेवीची रक्कम परत देणे हे पोलीस स्टेशनच्या अधिकारात येत नाही. तब्बल दहा वर्ष उलटून देखील जर न्यायालयाच्या आदेशानंतर देखील त्यांना त्यांच्या ठेवीची रक्कम मिळाली नसेल तर त्यांनी न्यायालयाचा अवमान प्रकरणी पुन्हा न्यायालयात दाद मागावी , ‘ असे सांगण्यात आलेले आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती मात्र संबंधित कुटुंबीय हे उपोषण करण्यावर ठाम असून ठेवीची रक्कम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन समोरून हटणार नाही , असा निर्धार व्यक्त केलेला आहे. 

पारनेर तालुक्यातील उपोषणाची ही बाब जवळा येथील रहिवासी असलेले एडवोकेट रामदास घावटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उपोषण स्थळी जाऊन संबंधित कुटुंबीयांची विचारपूस करत उपोषण करणाऱ्या व्यक्तींच्या वतीने खाजगी न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आलेली असून याप्रकरणी आता बारा तारखेला गुन्हा दाखल करणेविषयी सुनावणी आहे त्या निर्णयानंतर आम्ही पुढील दिशा ठरवू असे उपोषणकर्त्या व्यक्तींच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. 

चार कुटुंबीयांपैकी बहुतांश जणांना शुगर बीपी हृदयरोग अशा स्वरूपाचे आजार असताना देखील उपचारासाठी आम्हाला आर्थिक अडचणी येत आहेत.  मेहरबान न्यायालयाने आदेश करून देखील आमच्या ठेवी मिळालेल्या नाहीत त्यामुळे आता उपोषणाला बसण्याशिवाय काही पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता , असे म्हटलेले आहे. निवृत्ती गेनू पळसकर , लक्ष्मण शंकर सुरकुंडे , रामदास संभाजी थोरात आणि मनीषा संजय राऊत अशी उपोषण करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत . 29 जानेवारीपासून त्यांनी उपोषण सुरू केलेले असून संस्थेचे चेअरमन रंगनाथ वराळ , व्हॉइस चेअरमन विलास हारदे व संचालक मंडळ यांच्यावर ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम ( एमपीआयडी ) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे .


शेअर करा