‘ त्या ‘ घटनेशी संग्राम जगताप यांचा कुठलाही संबंध नाही , पोलीस निरीक्षकांकडून खुलासा

शेअर करा

नगर जिल्ह्यातील राहुरी इथे आढाव वकील दाम्पत्याची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आलेली होती. एका पत्रकाराने या घटनेच्या संदर्भात नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी त्यानंतर तात्काळ या वृत्ताचे खंडन करत सीआयडीमार्फत सध्या तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. 

संबंधित पत्रकाराच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राजाराम आढाव आणि मनीषा आढाव यांचे 25 जानेवारी रोजी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती. आरोपींनी हत्या केल्यानंतर दोघांचेही मृतदेह विहिरीत टाकून दिले होते. अहमदनगर जिल्हा बार असोसिएशन तर्फे 29 तारखेपासून जिल्हा न्यायालयासमोर धरणे आंदोलन त्यानंतर सुरू करण्यात आलेले असून आजही हे आंदोलन सुरू आहे. वकील संरक्षण कायदा तात्काळ आणून त्याची अंमलबजावणी करावी अशी एकमुखी मागणी वकिलांकडून करण्यात येत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला होता. 

मुंबईतील एका वरिष्ठ ज्येष्ठ पत्रकाराने एका यूट्यूब चैनल वर स्थानिक नागरिकांचा हवाला देत ही टोळी आमदार संग्राम जगताप यांच्याशी संबंधित असल्याचा दावा केलेला होता आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील घटनेचा संदर्भ जोडलेला होता त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. 

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी मात्र या वक्तव्याचे खंडन करत , ‘ घटनेतील मुख्य आरोपी असलेला किरण दुशिंग हा सराईत गुन्हेगार असून विकृत प्रवृत्तीचा आहे . त्याने केवळ खंडणीसाठी हे कृत्य केलेले असल्याचे तपासात प्राथमिक दृष्ट्या आढळून आलेले आहे. त्याच्यासोबत आरोपी सागर खांदे , शुभम महाडिक , हर्षल ढोकणे , बबन मोरे सर्वजण राहुरी तालुक्यातील असून या घटनेशी आमदार संग्राम जगताप यांचा कुठलाही संबंध आढळून आलेला नाही सदर प्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे , ‘ असे सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा