नगर अर्बन बँक घोटाळ्यातील ‘ त्या ‘ आरोपींना सॉफ्टवेअर कंपनीनं मोकळं रान करून दिलं

शेअर करा

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी आरोपींची संख्या एकूण 105 असून विशेष म्हणजे यामध्ये आरोपी क्रमांक 105 वर एका सॉफ्टवेअर कंपनीचा समावेश आहे . सदर सॉफ्टवेअर कंपनीने अर्बन बँकेतील गैरव्यवहाराबाबत बॅक डेटेड एन्ट्री करण्याची ‘ अनोखी ‘  सुविधा घोटाळेबाजांना दिलेली होती त्यामुळे त्यांना मोकळे रान मिळाले आणि सॉफ्टवेअरमध्ये देखील छेडछाड करून हा सर्व घोटाळा करण्यात आलेला आहे. 

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींची संख्या एकूण 105 असून आरोपींची लिस्ट सोशल मीडियावर देखील जोरदार व्हायरल झालेली आहे. पहिल्या सहा आरोपींमध्ये दिवंगत भाजप नेते दिलीप गांधी यांच्या कुटुंबीयांशी संबंधित व्यक्तींचा समावेश असून अटकेत असलेल्या आरोपींचा देखील या लिस्टमध्ये समावेश आहे. 

सदर चार पानाच्या लिस्टमध्ये संचालक मंडळ , त्यांचे नातेवाईक तसेच नातेवाईकांना कुठल्या स्वरूपाचा फायदा झालेला आहे हे देखील नमूद केलेले असून त्यामध्ये काहींची वैयक्तिक नावे आहेत तर काही कंपन्यांना देखील रकमेचा गैरविनियोग केल्याप्रकरणी आरोपींमध्ये सामील करण्यात आलेले आहे . सर्व आरोपींनी मिळून एकमेकांच्या साथीने संगनमताने हा गैरव्यवहार केल्याचा आरोप नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी यांनी केलेला आहे. 

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी असलेल्या माजी संचालकांच्या मालमत्ता बाबतची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागविण्यात आलेली असून तसे पत्र आर्थिक गुन्हे शाखेने विभागाला पाठवले आहे. माजी संचालकांची मालमत्ता हाती आल्यानंतर त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आणि त्यांनी कमावलेली मालमत्ता याची सांगड जुळवणे आर्थिक गुन्हे शाखेला सोपे होणार असून नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात आता तपासाला गती आलेली आहे. 

आर्थिक गुन्हे शाखेला गैरव्यवहार प्रकरणी पत्नी , पत्नीचा भाऊ , सासू , सासरा तसेच इतर जवळचे नातेवाईक व नाजूक संबंधातील व्यक्ती यांच्या नावावर असलेल्या संपत्तीची देखील शहानिशा करणे नितांत गरजेचे आहे कारण अनेकदा बेकायदा पद्धतीने कमावलेली संपत्ती जवळच्या नातेवाईकांच्या नावावर केली जाते. नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात माजी अध्यक्ष अशोक कटारियासह आणखीन दोन माजी संचालकांना अटक करण्यात आलेली आहे .आरोपींनी अनेक मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत अशी ठेवीदारांमध्ये चर्चा असून मालमत्ता खरेदी-विक्रीची नोंद दुय्यम निबंधक कार्यालयात असते त्यामुळे आता आरोपींचे धाबे दणाणले आहे. अनेक संचालक अटकेच्या भीतीने नॉट रिचेबल झालेले आहेत.


शेअर करा