नगर शहरात हजारो वकिलांचा ‘ पायी मार्च ‘, बाराव्या दिवशी धरणे आंदोलन मागे

शेअर करा

नगर जिल्ह्यातील राहुरी येथील एका वकील दांपत्याच्या हत्येनंतर अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने 29 जानेवारीपासून धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली होती.  वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी जिल्हा न्यायालयासमोर सुरु असलेल्या वकिलांच्या धरणे आंदोलनाचा आज समारोप करण्यात आलेला असून नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बार असोसिएशन देखील आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या . आज 9 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा न्यायालयासमोरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आलेला होता त्यामध्ये हजारोंच्या संख्येने वकील सहभागी झालेले होते. वकिलांच्या संरक्षणासाठी सरकारने कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना संघटनेच्या माध्यमातून देण्यात आले आणि त्यानंतर या धरणे आंदोलनाचा आज समारोप करण्यात आला. नगर चौफेर प्रतिनिधी सोबत बोलताना वकील बंधू-भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.

अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने सुरू करण्यात या आंदोलनाला नगर जिल्ह्यातून तसेच नगर जिल्ह्यात सोबत इतर जिल्ह्यातून देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला . 29 जानेवारी तारखेपासून न्यायालयीन कामकाज प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर तालुकास्तरावर देखील बार असोसिएशनने अशाच स्वरूपाची भूमिका घेतली . विविध राजकीय पक्षांनी देखील जिल्हा न्यायालयासमोर येऊन बार असोसिएशनच्या मागणीला पाठिंबा दर्शवला होता. 

आज सकाळी 11:00 च्या सुमारास नगर जिल्हा तसेच तालुका स्तरावरील बार संघटनेचे सदस्य असलेले वकील यांनी जिल्हा न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि त्यानंतर ‘ एक वकील लाख वकील ‘, आढाव दांपत्याला न्याय मिळालाच पाहिजे ,  घटनेतील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करा तसेच वकील संरक्षण कायदा लागू झालाच पाहिजे या मागणीसाठी जिल्हा न्यायालयासमोरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला. अचानकपणे सुमारे पाच हजार पेक्षा जास्त वकील वकिली पेशाचा काळा कोट घालून रस्त्यावर उतरल्यानंतर संपूर्ण शहरात याची जोरदार चर्चा सुरू झाली. जिल्हा न्यायालया समोरून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वकील बंधू भगिनी रस्त्यावर उभे राहून घोषणा देत होते. 

कुठलीही वाहतुकीची गैरसोय होणार नाही या दृष्टीने या मोर्चाचे नियोजन करण्यात आलेले होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात , नगरचे आमदार संग्राम जगताप , शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते विक्रम राठोड , राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे , शरद पवार गटाचे नेते अभिषेक कळमकर यांच्यासोबत अनेक राजकीय पदाधिकारी आणि नेते देखील या आंदोलनात सहभागी झालेले होते. मोजक्या शब्दात त्यांनी यावेळी आपल्या भावना मांडलेल्या असून वकिलांच्या मागणीला आपले समर्थन असून आगामी काळात शासन दरबारी या मागणीचा पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन वकिलांना राजकीय नेत्यांकडून देखील देण्यात आलेले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात सदर प्रकरणी संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आले आणि त्यानंतर धरणे आंदोलनाचा समारोप करण्यात आला. 


शेअर करा