नगर जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण बिघडलंय , जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर निर्देश 

शेअर करा

अहमदनगर जिल्ह्यात सद्य परिस्थितीत मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत फार कमी होत आहे ही अतिशय गंभीर बाब असल्याकारणाने समप्रमाणात हे प्रमाण आणण्यासाठी प्रसूतीपूर्व तपासणी संदर्भात कारवाईचे कठोर निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिलेले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी बैठकीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे , अशासकीय सदस्य सुधा कांकरिया यांच्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली होती. 

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी यावेळी बोलताना जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी होत असून ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने गंभीर आहे . सदर प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षपणे लक्ष ठेवून काम करत अनधिकृतपणे गर्भ चिकित्सा करणे तसेच प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांची माहिती घेऊन दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी , असे देखील निर्देश दिलेले आहेत. 

जिल्हाधिकारी यांनी त्यानंतर मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तराचे प्रमाण समान राहील या दृष्टीने नागरिकांच्या विचारात देखील बदल करणे गरजेचे आहे असे देखील मत नोंदवत ही जागृती करण्यासाठी अंगणवाडी सेविका , आशा वर्कर यांची देखील मदत घ्यावी आणि लिंग गुणोत्तराची माहिती असणारे फलक गावात लावावेत असे देखील आदेश केलेले आहेत. 


शेअर करा