शासन आपल्या दारी अन सर्वत्र गुन्हेगारी , महाराष्ट्राचा बिहार अन घसा बसलेला मीडिया 

शेअर करा

शासन आपल्या दारी आणि सगळीकडे गुन्हेगारी असे सध्या महाराष्ट्रात चित्र निर्माण झालेले असून एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असून देखील कायदा सुव्यवस्था कोलमडून पडलेली आहे . एकीकडे कांद्याची निर्यात बंदी आणि दुसरीकडे विमा कंपन्यांची मनमानी यामुळे वैतागलेला शेतकरी तर सुरक्षेच्या भीतीने ग्रासले गेलेले वकील आणि महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवल्यामुळे बेरोजगारीत डुबलेला महाराष्ट्राचा तरुण अशा पद्धतीचे सध्या राज्यात चित्र असून माध्यमांचा देखील घसा बसलेला असल्याने सरकारला प्रश्न विचारायला ते तयार नाहीत. शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी देखील केवळ नागरिकांनाच नव्हे तर मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणेला वेठीस धरून हा ‘ इव्हेंट ‘ साजरा केला जातो त्यामुळे शासकीय कार्यालयात अधिकारी देखील बेपत्ता असतात त्याचा नागरिकांना त्रास होतो ती गोष्ट वेगळी.. 

काही दिवसांपूर्वी पुण्यात शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाला त्यात त्याचा मृत्यू झाला. जालन्यामध्ये गजानन तौर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार झाला त्यात त्याचा मृत्यू झाला  . ठाण्यामध्ये तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर चक्क पोलीस ठाण्यात गोळीबार झाला तर मुंबईमध्ये फेसबुक लाईव्ह सुरू असताना अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कायदा हातात घेण्याचे प्रमाण सातत्याने वाढलेले पाहायला मिळत असून या गुंडांना कुणाची भीती राहिलेली नाही की पोलीस यंत्रणाच कुणाच्या दबावात डोळेझाक करते ? असे प्रश्न यामुळे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. अशा गुंडांच्या नावावर एकीकडे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल होतात तर दुसरीकडे मंत्र्यांच्या उपस्थितीत हे गुन्हेगार भाजपमध्ये प्रवेश करतात त्यामुळे पोलीस यंत्रणेवर किती दबाव असेल याची कल्पनाही करवत नाही. 

धार्मिक आणि जातीय मुद्द्यांवरून माध्यमांनी नागरिकांना झुलत ठेवायचे आणि कोण कुणाच्या पक्षात आला ? कोणी कोणाचा गट फोडला ? कोण कोणाच्या संपर्कात अशा बातम्या 24 तास फ्लॅश करत राहायच्या यामुळे नागरिकांचे मूलभूत प्रश्न आणि त्यांची सुरक्षा याकडे राज्य सरकारचे सपशेल दुर्लक्ष झालेले आहे. आरोग्य , शिक्षण , महिला सुरक्षा , रोजगाराच्या संधी, शेतकरी प्रश्न या बातम्या माध्यमांमध्ये चर्चेत यायच्या तो काळ आता इतिहास जमा झालेला असून कुणी कुणाचे आमदार फोडले ? कोण कोणाच्या संपर्कात ? कुणाला कोणत्या पक्षाचे तिकीट ? कोण नवीन पक्ष स्थापन करणार याच्यातच माध्यमे चोवीस तास लोळत पडलेली आहेत. राज्यात चमकोगिरी करण्यास उत आलेला असून सोबत डझनभर कॅमेरामन घेऊन फिरणारे लोकप्रतिनिधी सध्या टिकटॉकर झालेले आहेत. 

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारला प्रश्नांचीच ऍलर्जी असल्याचे गेल्या अनेक घटनांमधून दिसून आलेले आहे . प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे , त्यांच्यावर हल्ले करायचे अशी प्रवृत्ती वाढलेली पाहायला मिळत आहे . पत्रकार म्हणून काम करणारे निखिल वागळे यांच्यावर देखील पुण्यात डेक्कन भागात खंडूजी बाबा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केलेला असून असे मर्दानी (?) हल्ले करणे ही भाजपची खासियत आहे कारण विचारांनी उत्तर देण्याची भाजपच्या नेत्यांची बुद्धीच नाही. 

पत्रकार निखिल वागळे यांची गाडी पोलीस सुरक्षेत दांडेकर पुलाजवळ राष्ट्र सेवा दलाच्या नियोजित सभास्थळी जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. पत्रकारितेच्या माध्यमातून व्यवस्थेला सडेतोड प्रश्न विचारणारे निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पत्रकार बांधवांमध्ये देखील संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांची सुरक्षितता असताना हा हल्ला झाला यावरून हा हल्ला सरकार पुरस्कृत होता का ? अशी देखील चर्चा सुरू झालेली असून एकंदरीत राज्याची परिस्थिती भयावह झालेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायम संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या ईव्हीएम वरील निवडणूक प्रक्रियेवर बंदी घालून बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे घेण्यावर राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. भारतासारख्या देशात निवडणूक प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात असणे ही लोकशाहीसाठी चांगली बाब नाही. 


शेअर करा