पेट्रोल 100 रुपये पार गॅस हजार रुपये पार आणि स्वातंत्र्यापासून आतापर्यंत बेरोजगारीत नवीन उच्चांक देशाने मोदी सरकारच्या अपयशी कार्यकाळात गाठला. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवून महाराष्ट्राच्या हातात कटोरा देणाऱ्या भाजपला काही नीतिमत्ता शिल्लक राहिली आहे का ? असा प्रश्न आता प्रत्येक व्यक्तीला पडल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक घरात आणि पक्षात बिभीषण शोधणाऱ्या भाजपने महाराष्ट्राच्या मातीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पाडली आणि या कृतीला निर्लज्जपणे चाणक्य नीति म्हणून गौरविण्यात आले. नगर शहरातील पुढार्यांच्या निष्ठा देखील एका रात्रीत बदलल्या आणि कार्यकर्ते मेंढरासारखे त्यांच्या मागे धावू लागले.
मोदी यांची प्रतिमा जिथे दिसेल तिथे चिटकवणाऱ्या भाजपच्या जाहिरात भैरवांनी आता गोदी इलेक्ट्रॉनिक मीडिया , प्रिंट मीडिया , सोशल मीडिया यांच्याही पलीकडे जाऊन शहरातील खाजगी आणि सरकारी मालमत्तेवर जाहिरातीस सुरुवात केली आहे. मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष भरकटवत नागरिकांना देशोधडीला लावणाऱ्या भाजप सरकारला आणि स्थानिक भाजप नेत्यांना अशी जाहिरात करण्याआधी थोडासा तरी विचार करावासा वाटत नाही ही त्याहून लाजिरवाणी गोष्ट असून विशेष म्हणजे भाजप नेते राम मंदिर काश्मीर यालाच पक्षाची उपलब्धी समजत असून शिक्षण आरोग्य पाणी रोजगार या गोष्टी आता दुय्यमच नव्हे तर कालबाह्य झालेल्या आहेत .
नगरचे भाजप नेते भैय्या गंधे यांचे नाव शहरात सुरु असलेल्या या पेंटिंगवर असून पेंटिंग व सोबत भाजपचे चिन्ह देखील भगव्या हिरव्या आणि निळ्या रंगात रंगवण्याचे काम सुरू आहे. शहरात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी फ्लेक्सच्या माध्यमातून धुमाकूळ तर घातलाच आहे मात्र त्यानंतर आता हा नवीन प्रकार नागरिकांच्या प्रॉपर्टीवर ठासून मारला जात आहे. संपूर्ण देशच आम्ही विकत घेतला आहे अशा अविर्भावात शहरातील भाजप नेत्यांचा अहंकार प्रत्येक ठिकाणी नागरीक अनुभवत आहेत. भाजप नेते सुरेंद्र गांधी , भाजपचाच नगरसेवक स्वप्नील शिंदे , भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यावर कुठल्या कलमाखाली गुन्हे दाखल झाले हे देखील नगरकरांना माहिती आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडिया गोदी मीडिया बनवला , प्रिंट मीडिया वर बंधने अघोषितपणे लादली गेली सोशल मीडियावर देखील ‘ रिच ‘ ठेवण्यावर अंकुश अघोषितपणे आणण्यात आला . खोटी फेसबुक , ट्विटर अकाउंट आणि सोशल मीडिया हँडल बनवून खोट्या बातम्या पसरवण्याचे काम करण्यात आले. काही लाखांच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये धार्मिक विद्वेषाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. सोसायटीतले रिकामटेकडे रिटायर्ड अंकल आणि धार्मिक विद्वेषाने पछाडलेले तरुण धर्मकार्य राष्ट्रकार्य समजून इतर नागरिकांना जगण्याचाच हक्क देखील नाकारू लागले. मुस्लिम आणि इतर मतदान काँग्रेसकडे जाऊ नये म्हणून बी टीम देखील बनवण्यात आल्या.
काँग्रेस आणि आधीच्या सरकारच्या काळात जे काही कमावलं ते सर्व टप्प्याटप्प्याने मॉनिटायझेशनच्या गोंडस नावाखाली अडाणी अंबानीच्या तिजोरीत टाकण्यात आलं आणि दुर्दैव म्हणजे प्रॉपर्टी विकून खाण्यालाच उपलब्धी सांगत ‘ राष्ट्रहित सर्वोपरि ‘ म्हणत आजही देशवासीयांना उल्लू बनवलं जातंय . इतकं सगळं असूनही भाजप सत्तेत का येते ? असा प्रश्न जर पडत असेल तर फक्त ईव्हीएमचा विषय काढून पहा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या याबद्दल आग्रही रहा त्यानंतर या अंधभक्तांची कशी भंबेरी उडती ते पहा.अडाणी अशिक्षित नागरिक हीच खरी भाजपची ताकद असल्याने खरी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे सर्व मार्ग टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहेत.