नगरचा बिहार ? गुलमोहर रोडवर व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला 

शेअर करा

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याच्या रोज नवीन बातम्या येत असून पुण्यात शरद मोहोळ हत्याकांड , ठाण्यात पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हवर हत्या आणि त्या पाठोपाठ नगर शहरात देखील तोफखाना पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या एका व्यावसायिकावर तलवारीने झाल्याचा प्रकार काल दहा तारखेला रात्री दहाच्या सुमारास घडलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , नगर शहरातील सावेडी परिसरातील गुलमोहर रोड येथील किर्लोस्कर कॉलनी इथे बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेलेला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलेला आहे तर हल्ल्याच्या ठिकाणी एक पिस्तूल आढळून आले आहे . 

नगर शहरातील उच्चभ्रू आणि शांत परिसर म्हणून गुलमोहर रोडची ओळख आहे आणि गुलमोहर रोड पासून अवघ्या काही मीटरवर तोफखाना पोलीस स्टेशन आहे . तोफखाना पोलीस स्टेशनच्या पाठीमागे दोनच दिवसांपूर्वी गंगा उद्यान जवळ एक माणूस गावठी कट्टे विकताना आढळून आलेला होता. तोफखाना पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ या दोन्ही घटना दोनदिवसांच्या अंतराने घडल्यानंतर पोलिसांचा शहरात काही वचक आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. 


शेअर करा