कोतवालीच्या तानाजी पवारला निलंबित करण्यासाठी मनसे आक्रमक, काय आहे प्रकरण ?

शेअर करा

नगर –  दि. ८ फेब्रुवारी रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलिस कर्मचारी तानाजी पवार यांनी विनाकारण कुठलीही शहानिशा न करता मनसेचे विभाग अध्यक्ष किरण रोकडे यांना मारहाण केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत असून पोलीस कर्मचारी तानाजी पवार यास तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे . 20 फेब्रुवारी पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कार्यालय येथे उपोषणाला बसण्यात येईल असे मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी सांगितले असून याबाबतचे निवेदन आज पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मनसेतर्फे देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अनिता दिघे, शहर सचिव डॉ. संतोष साळवे, उपशहराध्यक्ष संकेत व्यवहारे, दिपक दांगट, विभाग अध्यक्ष महेश चव्हाण, प्रवीण गायकवाड, वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे, प्रशांत जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

पोलीस अधीक्षक ओला यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभाग अध्यक्ष किरण प्रशांत रोकडे मी दिनांक ८/०२/२०२४ रोजी माझा मित्र सनी भुजबळ यास काही तरुणांनी मारहाण केल्यामुळे मी त्याच्या सोबत कायदेशीर तक्रार देण्यासाठी गेलो होतो त्या वेळेस मी पोलीस निरीक्षक श्री दराडे साहेब यांना जाऊन भेटलो असता आम्हाला कायदेशीर तक्रार द्यायची आहे असे सांगितले असता त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही १० मिनिटे बाहेर जाऊन बसा नंतर तुम्हास बोलवतो व तुमची कायदेशीर तक्रार नोंदवून घेतो असे सांगितल्या मुळे मी व माझा मित्र पोलीस स्टेशनच्या आवारातील झाडाखाली उभे राहिलो होतो त्या नंतर ५ मिनिटांनी सिव्हिल ड्रेस परिधान केलेला तानाजी पवार हा पोलीस कर्मचारी येथे आला व त्याने मला किरण रोकडे तूच का असे विचारले असता त्याने मला अर्वाच्य शिवीगाळ करत काही कारण नसताना मला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व तू इथून लगेच निघून जा परत जर इथे दिसलास तर तुला संपून टाकिन तसेच तुला खोट्या गुन्हात अडकून तानाजी काय आहे हे तुला दाखवील असेही ते म्हणाले . पोलीस कर्मचारी तानाजी पवार याने कायदा हातात घेऊन मला वरील प्रमाणे मारहाण केली असून कोतवाली पोलिस स्टेशनच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासून सदरील कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यास पोलीस सेवेतून निलंबित करण्यात यावे ही नम्र विनंती.

दि. ८/०२/२०२४ रोजी पत्र दिले होते त्या वर कोणतीही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या पोलीस अधीक्षक कार्यालय बाहेर उपोषणास बसणार आहोत असे निवेदनात म्हटले आहे.


शेअर करा