महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाल्याच्या रोज नवीन बातम्या येत असून पुण्यात शरद मोहोळ हत्याकांड , ठाण्यात पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हवर हत्या आणि त्या पाठोपाठ नगर शहरात देखील तोफखाना पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या एका व्यावसायिकावर तलवारीने झाल्याचा प्रकार दहा तारखेला रात्री दहाच्या सुमारास घडला होता.
नगर शहरातील सावेडी परिसरातील गुलमोहर रोड येथील किर्लोस्कर कॉलनी इथे बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झालेले होते. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेलेले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलेला आहे . हल्ल्याच्या ठिकाणी एक पिस्तूल आणि तलवार सदृश हत्यार आढळून आले होते.
धीरज जोशी यांच्यावरील हल्ल्याला दोन दिवस उलटले तरी या हल्ल्यामागे असलेले नेमके कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. हल्ला करण्याआधी आरोपींनी त्यांना शिव्या दिल्या इतकीच माहिती असून आत्तापर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही तर हल्ल्यामागचे कारणही समोर आलेले नाही. नगर शहरातील विविध राजकीय पक्ष आणि संघटना यांनी जोशी यांच्यावरील हल्ल्यामागचे कारण शोधून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन केलेली आहे.
दुसरीकडे राहुरीतील आढाव दांपत्याच्या हत्येमागील मागील कारण देखील अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली पाहायला मिळत असून दर चार दिवसाला गावठी कट्टा विकणारे जेरबंद केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत . आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासाठी ही धोक्याची घंटा आहे.