‘ तुला अटक करायचे तर अटक कर ‘, मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा

शेअर करा

मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बीड जिल्ह्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून जरांगे पाटील यांच्यावर दबाव आणण्यासाठी सध्या सत्ताधारी राजकीय पक्ष आणि संपूर्ण शासकीय यंत्रणेने कंबर कसली आहे. मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी देखील करण्यात येणार असून मनोज जरांगे पाटील आज पुन्हा आंतरवाली सराटी येथे रवाना होणार आहेत. अंतरवाली सराटी इथे आता साखळी उपोषणाला पुन्हा सुरुवात करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे मात्र सध्या अंतरवाली सराटी इथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुसरीकडे मराठा बांधव मात्र पुन्हा मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी एकवटताना दिसून येत आहेत . 

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना , ‘ मी पुन्हा अंतरवाली सराटी येथे जाणार आहे . झालेल्या सर्व घडामोडींच्या पाठीमागे गृहमंत्री असून मराठ्यांना तुम्ही संपवायला निघाला आहात का ? . बोलल्यावर तुम्हाला शब्द लागतात ना पण याला जातीयवाद नाही तर काय म्हणतात ? . अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा मांडव आणि व्यासपीठ फक्त उखडून दाखवा . आयुष्यभर जेलमध्ये राहील तुला अटक करायचे तर अटक कर ‘, असे देखील आव्हान त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहे. 

दुसरीकडे अजय महाराज बारस्कर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी काही उत्तर दिलेले नसले तरी अजय महाराज बारस्कर यांच्या गावातील गावकऱ्यांनी अजय बारस्कर यांच्या विरोधात ठराव संमत केलेला असून अजय बारस्कर यांच्यासोबत आमचा कुठलाही संबंध नाही. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे या ठरावात म्हटलेले आहे. 

विशेष म्हणजे इतक्या मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे फोन येणे ही काही जगावेगळी गोष्ट नाही . एसआयटी चौकशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना तथाकथित राजकीय नेत्यांचे काही फोन जरी आले असतील तरी या निमित्ताने त्या नेत्यांवर देखील निशाणा साधण्याचे आयती संधी संपूर्ण यंत्रणेला आणि सत्ताधाऱ्यांना मिळणार आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणेकडून मनोज जरांगे यांचे चारित्र्यहनन करणे त्यांना बदनाम करणे त्यांच्यावर आरोप करणे यासाठी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. अजय बारस्कर तसेच इतर काही व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ज्या पद्धतीने मीडिया कव्हरेज देण्यात आले त्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच निशाणा साधलेला होता.


शेअर करा