
मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा अंतरवाली सराटी इथे दाखल झालेले असून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुन्हा ते उपोषणस्थळी पोहोचले आहेत. आंतरवाली सराटी येथील मंडप आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही मराठा समाजाची अस्मिता आहे ते हटवण्याचे पाप करू नका, असे देखील त्यांनी यावेळी राज्य सरकारला बजावले आहे. ‘ गुन्हे दाखल करा आणि आयुष्यभर तुरुंगात ठेवा पण माझ्या मागणीपासून तसूभरही हलणार नाही ‘ असे खुले आव्हान त्यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा दिलेले आहे.
मागील काही महिन्यांपासूनच्या घडामोडी पाहिल्या तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दिशा भरकटवण्यासाठी अनेक शक्तींनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले मात्र त्यास सपशेल अपयश आले आणि बहुसंख्य मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उलट यामुळे ठामपणे उभा राहिला. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत मराठा बांधवांची केवळ हेळसांड झाली असल्याची समाजाची भावना असून मुठभर मराठा नेत्यांनी आपला स्वार्थ साधला मात्र आपल्या समाजाच्या तोंडाला पाणी पुसली असे अनेक जण प्रत्यक्ष बोलून दाखवतात. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी एकवटणारा समाज हा याच भावनेतून आज मनोज जरांगे पाटील यांचा कट्टर समर्थक झालेला आहे.
महाराष्ट्रातील राजकारण पाहता आज मराठा समाजाचे नेते कुठल्याही एका पक्षात एकवटलेले दिसून येत नाहीत अर्थात यापूर्वी देखील तशी परिस्थिती नव्हती मात्र शिवसेनेत पडलेली फुट आणि राष्ट्रवादीत पडलेली फुट यामुळे त्याचे आणखी विभाजन झाले. एकाच कुटुंबातील एक व्यक्ती एका पक्षात दुसरा व्यक्ती एका पक्षात या नाटकी राजकारणाला आता जनसामान्य जनता तर सोडा पण मराठा बांधव देखील प्रचंड वैतागले आहेत. मुठभर मराठा नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ साधत शैक्षणिक संस्था साखर कारखाने आणि कंपन्या उभ्या केल्या मात्र आज देखील गोरगरीब मराठ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल असून केवळ मूठभर राजकीय नेत्यांचे झेंडे आयुष्यभर वाहिल्याची समाजाची भावना झालेली आहे.
आगामी निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरी निवडणुका लढवण्याची घोषणा केली तरी मोठ्या प्रमाणात विखुरलेले मराठा नेते निदान स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी का होईना पण एकत्र येण्याची शक्यता आहे. मराठा समाजाची सध्या भरकटल्यासारखी अवस्था झालेली असून शेतीचे विविध प्रश्न , रोजगाराच्या कमी संधी , शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा बांधवांची होत असलेली उपेक्षा अन राजकीय नेत्यांच्या सतरंज्या उचलण्यापर्यंतच मराठा बांधवांच्या तरुणांना पक्षात मिळणारे स्थान यामुळे वैफल्यात असलेल्या समाजाला मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा आकर्षित करतो आहे. आगामी निवडणुकीच्या काळात मनोज जरांगे पाटील यांचाच चेहरा नेतृत्व म्हणून यासाठी पुढे आणावा लागेल कारण इतर मराठा नेत्यांवर समाजाचा किंचितही विश्वास सद्य परिस्थितीत उरला नाही.
पक्षाची विचारसरणी वगैरे शब्द सध्या कालबाह्य झालेले असून अर्ध्या रात्रीत निष्ठा बदललेल्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेल्या आहेत . अनेक राजकीय पुरुष नेत्यांसोबत महिलांचा देखील समावेश अशा निष्ठा बदलण्यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. स्वतःच्या मालकीची दुचाकी देखील नसलेले जरांगे पाटील यांच्याबद्दल एकच गोष्ट स्पष्ट आणि भावणारी आहे ती म्हणजे समाजाबद्दलची निष्ठा. सर्व राजकीय पक्षांनी सध्या निष्ठा गुंडाळून ठेवल्या असल्याकारणाने मनोज जरांगे पाटील यांचा ब्रँड मराठा बांधवांना आपलासा आणि विश्वासार्ह वाटत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा बांधवांच्या निष्ठा धर्मापेक्षा जास्त जातीवर येऊन एकवटल्या असल्याचे निदान आज तरी दिसून येते. मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा ब्रँड आजच्या परिस्थितीत राजकारणात आला तर किमान मराठा बांधवांसाठी एक आशेचा किरण नक्कीच घेऊन येईल आणि मराठा लोकसंख्येचा विचार करता स्वतःच्या अस्तित्वाचीच लढाई सुरू झाल्यानंतर मराठा बांधवांचे आंदोलन मोडीत काढण्याची मोडीत काढण्याची भाषा करणारे वाचाळवीर मंत्री देखील गप्प राहतील..आगामी निवडणुकीतील यश काय येईल ते येईल मात्र निवडणुकीच्या निमित्ताने मराठा बांधवांचे संघटन आणखीन मजबूत होणार आहे हे मात्र निश्चित…