नगर अर्बन बँकेच्या तब्बल तेरा शाखा बंद करण्याचा निर्णय कारण..

शेअर करा

रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेचा व्यवसायिक परवाना रद्द केल्यानंतर एकीकडे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे तर दुसरीकडे तपास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदला बदल्या होत आहेत. बँकेचा सर्व कारभार सध्या अवसायकाच्या नियंत्रणाखाली असून बँकेच्या दैनंदिन प्रशासकीय खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने भाडेतत्त्वावर कार्यालय असलेल्या बँकेच्या तब्बल 13 शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

सदर शाखांचे पुढील व्यवहार आता नजीकच्या शाखांमधून तसेच मुख्य शाखेतून केले जातील अशी माहिती बँकेच्या प्रशासनाकडून देण्यात आलेले असून नगर जिल्ह्यातील सावेडी ,काष्टी, कर्जत , टाकळी मानुर , राहुरी , सोनगाव , सोनई , राहता या ठिकाणावरील शाखांचा यामध्ये समावेश आहे तर बीड जिल्ह्यातील कडा आणि परळी वैजनाथ येथील शाखा बंद करण्यात येतील तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि गुलटेकडी मार्केट यार्ड येथील शाखा बंद करण्यात येणार आहेत . 

शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर बँकेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असून सद्य परिस्थितीत ठेवीदार देखील मोठ्या चिंतेत आहेत. अनेक ठेवीदार कुटुंबीयांच्या मुला मुलींची लग्न रखडली आहेत तर कित्येक जणांच्या आजारांवर उपचाराला देखील पैसे नाहीत. बँकेतील ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असल्याचे आवाहन वारंवार अवसायक यांच्याकडून केले जात आहे मात्र सद्य परिस्थिती होरपळलेले नागरिक कुणावरच विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचे चित्र आहे .

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला त्यावेळी सुरुवातीला दीडशे कोटींचा घोटाळा होता मात्र फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हा घोटाळा 291 कोटींचा असल्याचे समोर आले. नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात ज्या कुठल्या अधिकाऱ्याने आरोपींवर हात टाकण्याचा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्यांची अवघ्या काही दिवसातच बदली झालेली आहे. ठेवीदारांना न्याय मिळावा म्हणून आरोपींच्या पाठी कारवाईचा ससेमिरा लावला की तात्काळ बदली होते असे अनेक चमत्कार या तपासात नगरकरांना पाहायला मिळत आहेत. 

आत्तापर्यंत या प्रकरणात आठ आरोपी न्यायालयीन कोठडीत असून प्रवीण जगन्नाथ पाटील ( वय 55 राहणार सावेडी अहमदनगर ),  राजेंद्र शांतीलाल लुणिया ( वय 56 राहणार कोठी रोड अहमदनगर ), मनेश दशरथ साठे ( वय 56 राहणार सारसनगर अहमदनगर ), अनिल चंदुलाल कोठारी ( वय 65 राहणार माणिक नगर अहमदनगर ), अशोक माधवलाल कटारिया ( वय 72 राहणार टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर ) शंकर घनश्यामदास अंदाणी ( वय 45 राहणार सावेडी अहमदनगर ), मनोज वसंतलाल फिरोदिया ( वय  56 राहणार सारसनगर आणि कर्जदार प्रवीण सुरेश लहारे ( वय 42 राहणार एकनाथ नगर केडगाव ) अशी आरोपींची नावे आहेत. 


शेअर करा