‘ लंगड्या काळे ‘ ची नाशिकला रवानगी , जिल्हाधिकारी यांची मंजुरी येताच काही मिनिटात..

शेअर करा

नगर जिल्ह्यातील पारनेर नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात घातक शस्त्रासह जबरी चोरी , दरोडे आणि मारहाण असे गंभीर स्वरूपाचे एकूण 16 गुन्हे दाखल असलेला कुख्यात दरोडेखोर लंगड्या उर्फ जयसखा अंकुश काळे ( वय 51 राहणार रांजणगाव मशीद तालुका पारनेर ) याला एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. 

आरोपी लंगड्या काळे याच्यावर पारनेर , नगर तालुका , बेलवंडी , श्रीगोंदा , सुपा या पोलीस स्टेशन हद्दीत पाच वर्षांच्या कालावधीत घातक शस्त्रांसह दरोडा , जबरी चोरी , चोरी करताना मारहाण, दरोड्याचा प्रयत्न अशा स्वरूपाचे तब्बल 16 गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत . सर्वसामान्य नागरिकांवर त्याने दहशत निर्माण केली त्यामुळे त्याच्या समाजविघातक कृत्यांना प्रचलित कायद्यानुसार कारवायांना मर्यादा येत होत्या. 

सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी त्याच्या विरोधात एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर ग्रामीण विभाग आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे सादर केलेला होता. राकेश ओला यांनी हा प्रस्ताव शिफारशीसोबत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे सादर केला आणि पडताळणी झाल्यानंतर काळे यास स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले. 

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार दत्तात्रय इंगळे , रवींद्र पांडे , सुरेश माळी , रवींद्र कर्डिले , अमोल कोतकर आणि सुपा पोलीस ठाण्याचे अशोक मरकड यांनी त्यानंतर काळेला ताब्यात घेतले आणि नाशिक मध्यवर्ती कारागृह नाशिक इथे त्याची रवानगी केली. 


शेअर करा