
डीवायएसपी संदीप मिटके यांची नाशिक जिल्ह्यात बदली झाल्यानंतर नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांची नेमणूक झालेली आहे. संदीप मिटके यांची बदली होताच काही जणांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केलेला होता मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. डीवायएसपी अमोल भारती यांनी कारवाईस सुरुवात केलेली असून आणखीन एक आरोपी अविनाश प्रभाकर वैकर याला नगर शहरातील रासनेनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहे.
संदीप मिटके यांची बदली झाल्यानंतर आता तपास रेंगाळणार अशी आरोपींना अपेक्षा होती मात्र अमोल भारती यांनी आरोपींवर पुन्हा कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केलेली आहे. अविनाश प्रभाकर वैकर या आरोपीस नगरमधील सावेडी परिसरातील रासनेनगर येथून अटक करण्यात आलेली असून आज त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. सुरुवातीला दीडशे कोटींचा हा घोटाळा फॉरेन्सिक ऑडिटमध्ये मात्र 291 कोटींचा असल्याचे समोर आलेले होते. कारवाईच्या भीतीने अनेक संचालक आणि कर्जदार फरार झालेले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने वैकर यास अटक केलेली असून या पथकात पीएसआय निसार शेख, महिला पीएसआय मोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुयोग सुपेकर, महेश मगर, हेमंत खंडागळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली भागवत हे सहभागी झालेले होते.
रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेचा व्यवसायिक परवाना रद्द केल्यानंतर एकीकडे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे तर दुसरीकडे तपास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या होत आहेत. बँकेचा सर्व कारभार सध्या अवसायकाच्या नियंत्रणाखाली असून बँकेच्या दैनंदिन प्रशासकीय खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने भाडेतत्त्वावर कार्यालय असलेल्या बँकेच्या तब्बल 13 शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सदर शाखांचे पुढील व्यवहार आता नजीकच्या शाखांमधून तसेच मुख्य शाखेतून केले जातील अशी माहिती बँकेच्या प्रशासनाकडून देण्यात आलेले असून नगर जिल्ह्यातील सावेडी ,काष्टी, कर्जत , टाकळी मानुर , राहुरी , सोनगाव , सोनई , राहता या ठिकाणावरील शाखांचा यामध्ये समावेश आहे तर बीड जिल्ह्यातील कडा आणि परळी वैजनाथ येथील शाखा बंद करण्यात येतील तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि गुलटेकडी मार्केट यार्ड येथील शाखा बंद करण्यात येणार आहेत .