मराठा बांधव आता गनिमी काव्याने लढणार , नगरमधील बैठकीत निर्णय

शेअर करा

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे देखील निर्देश सरकारकडून देण्यात आलेले आहेत . मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील ‘ चौकशी बिनधास्त करा आणि झालीच पाहिजे ‘ अशी भूमिका घेतलेली आहे तर दुसरीकडे ‘ सगेसोयरे ‘ च्या अध्यादेशाचा कायदा झाला नाही तर लोकसभा निवडणुकीत 500 उमेदवार उभे करण्याचा निर्णय नगर येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. 

नगर शहरातील सावेडी येथील एका मंगल कार्यालयात शनिवारी बैठक पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आलेला असून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या बैठकीसाठी उपस्थित होते. जोपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व अटी शर्ती मान्य करून सरकार मराठा बांधवांना कायदेशीर आरक्षण देत नाही तोपर्यंत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मी कुठल्याही पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणार नाही आणि कुठल्याही नेत्याच्या सभेला जाणार नाही अशी शपथ घेण्यात आलेली आहे. 

मनोज जरांगे पाटील यांना विरोध करणारे अजय महाराज बारस्कर यांच्या गावातीलच माजी नगरसेवक सतीश बारस्कर आणि बबन बारस्कर हे देखील या बैठकीला उपस्थित होते . मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणारे अजय बारस्कर यांना गावातूनच मोठ्या प्रमाणात विरोध होत असून त्यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे फ्लेक्स गावात लावण्यात आलेले होते. 

मनोज जरांगे पाटील जीवावर उदार होऊन मराठा आरक्षणासाठीचा लढा लढत आहेत . त्यांचा आवाज दाबण्याचा सरकार प्रयत्न करत आहे . रस्त्यावरच्या लढाईची दखल घेतली जात नसेल तर आता गनिमी कावा लढवावा लागेल . ज्या आमदार खासदाराने आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही त्यांना मतदान करायचे नाही आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत चारशे ते पाचशे उमेदवार उभे करण्याचा देखील यावेळी निर्णय घेण्यात आलेला आहे. 

मराठा समाजाला यापूर्वी दोन वेळा दिलेले आरक्षण न्यायालयात टिकलेले नाही असे असताना 50% बाहेर आरक्षण पुन्हा माथी मारण्यात आलेले आहे . ते मराठा बांधवांनी नाकारले म्हणून सरकार त्यांच्या विरोधात कट रचत आहे असा आरोप मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे. सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही अशी भूमिका घेत मनोज जरांगे पाटील जे काही सांगतील ते आम्हाला मान्य असेल अशी समाज बांधवांची भूमिका सध्या पाहायला मिळत आहे. 


शेअर करा