बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर प्रकरणात राजकीय गुंतागुंत ? : पुण्यात खळबळ

  • by

शहरातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर मागील ८ दिवसांपासून बेपत्ता असून अद्यापही त्यांच्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. गौतम पाषाणकर यांचे अपहरण झाल्याची शक्यता त्यांचे चिरंजीव कपिल पाषाणकर यांनी आता नव्याने व्यक्त केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण असल्याचंही बोललं जात आहे. वडिलांच्या अपहरणामागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप मुलगा कपिलने केला आहे. याआधी त्यांची सुसाईड न मिळून आली होती मात्र त्यांचा अद्याप शोध न लागण्याने प्रकरणात गुंतागुंत वाढली आहे. कपिल पाषाणकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन यामागे राजकीय व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या राजकीय व्यक्तीची माहिती कपिल यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिली आहे. Case of missing businessman Gautam Pashankar in Pune city

कपिल पाषाणकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना, ” स्वत: ती राजकीय व्यक्ती नव्हे तर त्याच्याशी संबंधित व्यक्ती या प्रकरणात आहे. वडिलांनी ज्या काही आर्थिक अडचणी होत्या त्याची चौकशी केली, तेव्हा मागील २-३ महिन्यापासून नेमकं काय घडलं होतं? वडिलांवर तणाव का होता? त्यांच्या जवळच्या माणसांकडून माहिती घेतली असता एक व्यक्ती सतत वडिलांना पैशासाठी धमकावत असल्याचं कळालं, त्याने वडिलांवर केसही केली होती. आतापर्यंत आम्ही पुणे पोलिसांच्या तपासावर समाधानी आहे. पोलीस त्यांच्या तऱ्हेने गौतम पाषाणकर यांच्या प्रकरणाचा तपास करत आहे ” असंही कपिल पाषाणकर म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर हे बुधवारी (दि. २१) सायंकाळपासून बेपत्ता झाले आहेत. गौतम पाषाणकर हे पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत तसेच बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. ते बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले आणि लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिस मध्ये गेले तेथून शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा त्यांनी चालकाकडे दिला आणि तो घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला त्यानंतर पाषाणकर ऑफिसमधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलिसात धाव घेतली आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविण्यात आली.

तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात आत्महत्या संदर्भातली चिठ्ठी आढळली. काही दिवसापासून व्यवसायात झालेल्या नुकसान यामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत असून याकरिता कोणालाही जबाबदार ठरू नये असे लिहिलेले आहे. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर कपिल पाषाणकर यांनी आता नवीनच शंका व्यक्त केल्यामुळे ह्या प्रकरणाला आता राजकीय गुंतागुंत देखील असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.