‘ साहेब तुमच्यासाठी माल जमवून ठेवला आहे ‘ नगरमध्ये धुमाकूळ घालणारी अप्पर पोलिस अधीक्षकाची कथित ऑडिओ क्लिप ऐका

शेअर करा

एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झालेले डॉ. दत्ताराम राठोड हे एका पोलीस कॉन्स्टेबल सोबत आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा करीत असल्याची कथित ऑडिओ क्लिप नगर जिल्ह्यात धुमाकूळ घालत असून शहरातील व जिल्ह्यातील बहुतांश व्हाट्सअप ग्रुप मध्ये सध्या या क्लिपची चर्चा आहे दरम्यान राठोड यांची बुधवारीच तडकाफडकी बदली देखील करण्यात आल्याने या क्लिपमुळेच त्यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आल्याची कुजबुज पोलीस दलात आहे.

राठोड हे नांदेड येथून 2 ऑक्टोबर रोजी नगर येथे रुजू झाले होते दरम्यान बुधवारी रात्री त्यांची बदली झाली. त्यांची नेवासा पोलीस स्टेशनच्या गर्जे नावाच्या कॉन्स्टेबल सोबत आर्थिक व्यवहारावर चर्चा झाल्याची क्लिप समोर आलेली आहे. या क्लिप मध्ये ‘ साहेब तुमच्यासाठी माल जमवून ठेवला आहे. डेरे साहेब व आम्ही सगळी तजवीज केली आहे, अशी ऑफर तो कॉन्स्टेबल राठोड यांना देत आहे तर राठोड हे देखील ‘ तू माझे सर्व कामकाज पहा. माझे काम होईल की रेड टाकायची गरज आहे, अशी संभ्रम निर्माण करणारी विधाने करत आहेत. ‘ तुमच्या बाईंनी खूप पैसे कमावले असतील ना ? उत्तरेत चांगले मार्केट आहे माझी बदली देखील तिकडेच व्हायला हवी होती ‘ असेही राठोड बोलले आहेत. बाईंना प्रत्येक पोलीस स्टेशन कडून दरमहा 50 हफ्ता मिळतो, असे या कॉन्स्टेबल क्लिप मध्ये सांगतो.

सदर क्लिप बाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ‘ आपण ती क्लिप ऐकलेली नाही’ असे सांगत त्यांनी या प्रकरणावर काहीही भाष्य करणे टाळलेले आहे, त्यामुळे ही क्लिप अधिकृत आहे की नाही याविषयी पोलिसांकडूनच काही खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजीत डेरे यांची चार दिवसापूर्वी नियंत्रण कक्षात बदली झालेली आहे .

दत्ताराम राठोड यांनी या क्लिपबद्दल हात वर केले असून ‘ सदरची क्लिप आपण ऐकलेली नाही. ती व्हायरल कोणी केली याची देखील कल्पना नाही ही तसेच गर्जे यांच्याशी आपले बोलणे झाले नाही ‘असे म्हटले आहे. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने 26 ऑक्टोबरला नगर शहरात भेसळयुक्त डिझेल पकडले आहे या भेसळयुक्त डिझेल मागे रॅकेट असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून रॅकेटच्या माध्यमातून राठोड यांची बदली करण्यात आली,अशी देखील कुजबुज कानी येत आहे. पोलीस अधीक्षकांनी या कारवाईच्या चौकशीचे आदेश दिलेले असले तरी देखील गर्जे यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची देखील चौकशी होऊन सत्य काय ते जनतेसमोर आले पाहिजे, अशी नागरिक आता मागणी करत आहेत.

भिंगार येथे ते 26 ऑक्टोबर रोजी बनावट डिझेल प्रकरणात कारवाई करताना गुन्हा दाखल करताना विलंब तसेच तडजोडीचा प्रयत्न करण्यात येऊन कागदपत्रांमध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तत्कालीन अप्पर पोलीस निरीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकातील एका अधिकाऱ्यासह सात पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. गुरुवारी संध्याकाळी ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत डोंगरे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश डहाळे,राजाराम शेंडगे, पोलीस नाईक अरविंद भिंगारदिवे, अजित घुले, संदीप धामणे, विनोद पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे

दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने 26 ऑक्टोबर रोजी भिंगार पोलीस स्टेशन हद्दीतील जीपीओ चौकात बनावट डिझेल साठ्यावर छापा टाकून एका आरोपीला अटक केली होती. दुपारी झालेल्या कारवाईचा गुन्हा रात्री उशिरा दाखल झाल्याने ही कारवाई देखील शहरात चर्चेचा भाग ठरली होती. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना दिले होते मदने यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर केला त्यानंतर विशेष पथकातील एका अधिकाऱ्यासह सात पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान बदली झालेले अप्पर पोलीस निरीक्षक दत्ताराम राठोड यांच्या कार्यपद्धतीत झालेल्या चुकीमुळे विशेष पथकातील कर्मचाऱ्यांचा नाहक बळी दिला गेल्याची कुजबुज नगर पोलिसात आहे.


शेअर करा