नगरमध्ये मोठी कारवाई , ‘ वर्ग एक ‘ च्या दोन महिला लाच घेताना ताब्यात

शेअर करा

लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार नगर जिल्ह्यात समोर आलेला असून पाटबंधारे विभागाच्या दोन महिला अधिकारी लाच घेताना सापळ्यात अडकलेल्या आहेत . विशेष बाब म्हणजे यातील दोन्ही महिला या वर्ग एकच्या अधिकारी आहेत. लाचखोरीचा पहिला हप्ता म्हणून ६२ हजार रुपये घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 18 तारखेला रंगेहात पकडलेले आहे . अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून तोफखाना पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , रुबिया मोहम्मद हनीफ शेख ( वय 35 सहाय्यक अभियंता वर्ग एक राहणार निर्मल नगर अहमदनगर ) आणि रजनी पाटील ( कार्यकारी अभियंता वर्ग एक , पाटबंधारे संशोधन विभाग , दिंडोरी रोड, नाशिक ) अशी महिला अधिकाऱ्यांची नावे असून राहुरी तालुक्यात उंबरे इथे पूर्ण झालेल्या एका कामाच्या 18 टक्क्यांनुसार एक लाख 39 हजार पाचशे रुपयांची लाच त्यांनी तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. 

राहुरी तालुक्यातील उंबरे इथे एक काम पूर्ण करण्यात आले त्याचे बिल काढण्याच्या बदल्यात ही लाच मागण्यात आली होती. शेख यांनी स्वतःसाठी आठ टक्के आणि पाटील मॅडम यांच्यासाठी दहा टक्के लाचेची मागणी केलेली होती. फिर्यादी व्यक्ती यांनी त्यानंतर नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि कारवाईचा सापळा रचण्यात आला. एसीबीच्या ट्रॅपमध्ये शेख यांना लाचेची रक्कम घेण्यात घेताना ताब्यात घेण्यात आले तर दुसऱ्या आरोपी रजनी पाटील यांनी देखील लाचेच्या मागणीला दुजोरा दिलेला असल्याचे कारवाई दरम्यान समोर आले. 

नियमात असलेले काम करून देण्यासाठी कोणी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 नंबर वर फोन करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आलेले असून तक्रारदार व्यक्ती यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे. अनेकदा नागरिक तक्रार करण्यास भीतीमुळे धजावत नाहीत त्यामुळे नागरिकांनी न भिता संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.


शेअर करा