‘ माणूस हाय लई साधा साधा ‘, निलेश लंके आज साधेपणाने अर्ज दाखल करणार कारण.. 

शेअर करा

‘ कुठल्याही पद्धतीने नागरिकांना त्रास होणार नाही ‘ असा निर्धार घेऊन अत्यंत साधेपणाने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी निलेश लंके 23 तारखेला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मतदारसंघातील आजी-माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहतील. 

निलेश लंके यांनी यापूर्वी देखील अंध , अपंग विधवा यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता यावेळी देखील ते अशाच पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार असून अर्ज दाखल करतेवेळी कुठल्याही पद्धतीने नागरिकांना त्रास होणार नाही याची समर्थकांनी काळजी घ्यावी , ‘ असे आवाहन लंके यांनी केलेले आहे. 

महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर निलेश लंके यांनी मोहटागडापासून जनसंवाद यात्रेला प्रारंभ केलेला होता. विशेष बाब म्हणजे जनसंवाद यात्रेत असताना देखील निलेश लंके हे नागरिकांसोबत त्यांच्या अडचणींविषयी सतत संपर्कात होते. निलेश लंके यांची हीच बाब त्यांना इतरांपासून वेगळी करत असून त्यांची हीच खासियत मतदारांच्या पसंतीस उतरत आहे. 

दुसरीकडे खासदार सुजय विखे यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या विधानाची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु असून खासदार सुजय विखे यांनी एका सभेत बोलताना , ‘ कॅमेरावाले भरपूर झाले.. शूटिंग काढलं आणि त्यापेक्षा जास्त तर हे माइकचे बांबू घेऊन फिरणारे झाले अन ते कोणत्या चैनलचे आहेत . पंधरा दिवसांपूर्वी त्यांचा चॅनेल जिल्ह्यात कोणाला माहिती नव्हता ‘, असे म्हटलेले होते.  खासदार सुजय विखे यांच्या टिकेचा रोख हा प्रामुख्याने ऑनलाइन पत्रकारिता करणाऱ्यांवर होता. 

सुजय विखे यांनी पत्रकारांचा असा उल्लेख करायला नको होता अशी सर्वत्र टीका होत असतानाच निलेश लंके यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर सुजय विखे यांच्या या वक्तव्यावर एक पोस्ट केलेली आहे त्यामध्ये  लंके यांनी ,’ सुजयजी यांना सामान्य नागरिकांच्या मनातून आलेल्या प्रतिक्रियांचा त्रास होत असल्याचे दिसून येते, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी जनता सत्य बोलणे सोडणार नाही.लोकांनी आपल्या विरुद्ध व्यक्तच होऊ नये ही मनोवृत्ती बाळगणाऱ्या ‘आधुनिक राजपुत्राने’ उन्हातान्हात जाऊन जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या #पत्रकारांची कुत्सित हेतूने केलेली थट्टा मागास मनोवृत्ती दर्शविणारे आहे. #वार_फिरलय ‘ असे म्हटलेले आहे . 

घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपचीच उमेदवारी विखे कुटुंबातील चौथ्या पिढीला आलेली आहे . खासदार डॉक्टर सुजय विखे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी परिचित असले तरी अनेकदा त्यामुळे ते अडचणीत येतात. तुतारी वाजवून टाका या वक्तव्यानंतर मतदारसंघातील वातावरण मोठ्या प्रमाणात बदलले आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे मात्र भाजपला विरोधच सहन होत नसल्याने अशा स्वरूपाचे प्रकार सातत्याचे नित्याचे झालेले आहेत. निलेश लंके यांचा साधेपणा आज रोजी तरी सुजय विखे यांच्या  झगमगाटाला डोईजड झालेला दिसून येत आहे.


शेअर करा