अल्पवयीन मुलीला पळवून अत्याचार ,  संगमनेर न्यायालयाने सुनावली ‘ ही ‘ शिक्षा

शेअर करा

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय पी मनाठकर यांनी हा निर्णय दिलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , रवींद्र वसंत गोंदे ( वय 27 वर्ष राहणार गोंदेवाडी संगमनेर )  हा दुचाकीवरून आला आणि त्याने 12 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीला शाळेत सोडतो असे सांगत दुचाकीवर बसवले आणि घारगावच्या दिशेने घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. 

आरोपीने त्यानंतर तिला पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात नेले आणि भाडोत्री खोलीसोबत इतर वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात लग्नाचे आमिष दाखवत धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रकार घरी येऊन सांगितला त्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तब्बल आठ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीला पंचवीस हजार रुपये दंड आणि वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


शेअर करा