
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने कंबर कसलेली असताना मतदार याद्यांमध्ये मात्र सावळा गोंधळ उडालेला दिसून येत आहे. अनेक नागरिकांना यामुळे मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आलेली असून अनेक जणांची नावे मतदार यादीतून गायब झालेली आहेत . विशेष म्हणजे गायब झालेली नावे ही एक वर्षांपूर्वीच गायब झालेली असून कुणी गायब केली याविषयी जिल्हा प्रशासनाकडे कुठलीही माहिती नाही.
अनेक सुदृढ मतदारांचा देखील उल्लेख अंध , अपंग असाही करण्यात आलेला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवीन मतदार नोंदणी , नावात दुरुस्ती , डबल आलेली नावे वगळणे , वय व्यक्तींची नावे रद्द करणे यासाठी मोहिमा राबवल्या जातात त्या अनुषंगाने मतदारांनी देखील योग्य पद्धतीने फॉर्म भरून दिले मात्र फॉर्म हाताळण्याचे वेळी अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे त्यामुळे अनेक जणांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे. इलेक्शन कार्डचा नंबर देऊन ऑनलाईन पोर्टलवर सर्च केल्यानंतर डाटा मिळालेला नाही असे उत्तर मतदारांना पहावे लागत आहे.
अनेक तरुण-तरुणींनी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानासाठी नाव नोंदणी केली होती मात्र तरी देखील अनेक जणांची नावे मतदार यादीत आलेली नाहीत. अवघ्या चार दिवसांपूर्वीच अनेक जणांनी तहसील कार्यालयातील निवडणूक आयोगाकडे धाव घेतली मात्र आता इतक्यात कमी वेळात काहीही करणे शक्य नाही ऑनलाईन तक्रार करा असा सल्ला देण्यात आलेला आहे. अनेक जणांनी त्यानंतर ऑनलाईन तक्रार देखील केली मात्र आता पुन्हा नव्याने फॉर्म भरून देण्याचा रिप्लाय त्यांना निवडणूक आयोगाकडून देण्यात येत आहे.
मयत व्यक्तीच्या वारस व्यक्तींनी मृत्यूचा दाखला संबंधित व्यक्तींचा जमा केला मात्र तरी देखील त्यांची नावे मतदार यादीत आढळून आली आहेत आणि अनेक जणांची नावे देखील चुकलेली आहेत. निवडणूक आयोग आणि प्रशासनाची ही ढिसाळ कार्यपद्धती काही विशिष्ट समाजाच्या नागरिकांच्या बाबतीत मुद्दाम घडलेली आहे का ? याविषयी देखील नागरिकांमध्ये संशय आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हेकेखोर प्रवृत्तीमुळे कर्मचारी वर्गाचा देखील कामचुकारपणा समोर आलेला असून हजारो व्यक्तींना त्यामुळे मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे.