
अहमदनगर येथील माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर मंगलगेट परिसरात हल्ला झालेला असून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना हा प्रकार घडल्याने शहरात या हल्ल्याची जोरदार चर्चा आहे. हल्ल्याचे टायमिंग पाहता राजकीय पार्श्वभूमी या हल्ल्यामागे असल्याचा अंदाज असून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी तात्काळ माजी नगरसेवक सचिन जाधव यांची खाजगी रुग्णालयात जाऊन भेट घेतलेली आहे.
निलेश लंके यांनी यावेळी , ‘ ज्या नगरसेवकावर हल्ला झालेला आहे ते सचिन जाधव आणि ज्यांनी हा हल्ला केलेला आहे ती व्यक्ती दोन्ही व्यक्ती माझ्या विरोधात प्रचार करत आहेत मात्र तरीदेखील राजकीय बाजू मतभेद बाजूला ठेवून एका कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आलेली आहे म्हणून आपण सचिन जाधव यांची भेट घेतलेली आहे . सचिन जाधव यांच्यावरील हल्ला हा कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे प्रतीक आहे ,’ असे म्हटलेले आहे.
निलेश लंके यांनी यावेळी , ‘ यापूर्वी देखील एक व्यक्ती रुग्णालयात दाखल झाला आणि त्याने निलेश लंके यांच्या समर्थकांनी हल्ला केला असे म्हटलेले होते मात्र पुन्हा त्याच व्यक्तीने माध्यमांसोबत बोलताना भाजपच्या काही जणांनी आपल्याला हा प्रकार करण्यास सांगितले होते असे म्हटले होते , ‘ याची पत्रकारांना आठवण करून दिली. मतदानाच्या ध्रुवीकरणासाठी सध्या एक राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील असून सुदैवाने नगरकरांनी आत्तापर्यंत अशा प्रयत्नांना कुठलीही साथ दिलेली नाही. उद्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बांधवांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे सोबतच अफवा रोखण्यासाठी देखील कंबर कसण्याची गरज आहे.