.. तर जगातील लोक आपल्याला महामूर्खांचा देश म्हणून ओळखतील

शेअर करा

तर जगातील लोक आपल्याला महामूर्खांचा देश म्हणून ओळखतील

नगर –  देशातील सध्याचे वातावरण हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून सर्वसामान्यांचा आवाज दाबला जात आहे. खरा इतिहास मिटवून खोटेपणाने नवा इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम लीग व हिंदू महासभेने एकत्रपणे युती करत पश्चिम बंगालमध्ये सरकार बनवले. कट्टर धर्मांधपणा हीच यांची विचारसरणी असून त्यांचे देश प्रेम हे बेगडी आहे. प्रसार माध्यमे विकत घ्यायची त्यांच्यावर दडपण आणायचं व तरी ते आपली चाकरी करत नसतील तर थेट मालकच बदलून टाकायचं अशा पद्धतीने मोदी व शहा यांनी देशातील प्रसिद्धी माध्यमे काबीज केली . अहमदनगर मध्ये अनेक वर्ष मुस्लिमांचे राज्य होतं म्हणून इथे काय सगळेच मुस्लिम झाले काय? . अनेक वर्ष या शहरात सर्वधर्मीय अगदी आनंदाने राहत होते. खरी गडबड धर्मांध लोकांनी हिंदू मुसलमान जेव्हापासून सुरू केले तेव्हापासून  झाली.  आपल्या सोयीनुसार विखे पाटील घराणे हे धर्मांध शक्ती बरोबर गेले असल्याने त्यांचा पराभव करणे गरजेचे आहे.लोकशाही वाचवण्याचे आव्हान सुजाण नागरिकांसमोर आहे. हे आव्हान जर स्वीकारले नाही तर पुढची पिढी आपणास कद्यापही माफ करणार नाही. यासाठीच नागरिकांनी निर्भय होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केले. निर्भय बनो व सकल भारतीय समाजाच्यावतीने  डॉ.विश्वंभर चौधरी, अ‍ॅड.आसिम सरोदे, अ‍ॅड.निशा शिवूरकर यांचे माऊली सभागृह येथे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.  अहमदनगर येथील रयत समाचार या दैनिकाच्या टीमने सभेच्या आयोजन संदर्भात महत्त्वाची  भूमिका बजावली.

अँड असीम सरोदे यावेळी म्हणाले की, राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय या नरेंद्र मोदी व अमित शहा च्या तालावर नाचत आहे. संस्था आणि व्यक्ती दबावात असून, न्यायव्यवस्थाही याला अपवाद नाही . काही न्यायाधीश हे सरकारच्या तालावर नाचत आहेत.  लोकांना मतदान करण्याचा सुद्धा अधिकार नाकारला जात असल्याचे इंदोर सुरत येथे दिसले. नोटाचा सुद्धा अधिकार सरकार हिरावून घेऊ पाहतो. चंदीगड येथे तर सत्तेच्या हव्यास पोटी लोकांच्या मतांचा सुद्धा त्यात हेरफेर करून अनादर करण्यात आला. नोटबंदी, इलेक्ट्रोलर बॉण्ड, पीएमके केअर फंड असे अनेक महाघोटाळे देशात मोदी सरकारने केले. मोदी व शहा यांची हुकूमशाही राजवट संपविण्याची हीच योग्य वेळ आहे. कोणत्याही धर्माच्या धर्माध्दपणा हा लोकशाहीसाठी मारक असून कट्टर हिंदूतव किंवा कट्टर मुस्लिम अथवा इतर कोणत्या धर्माच्या कट्टरपणा देशासाठी घातक असून या मुळे फाळणीशिवाय काहीही हातात येऊ शकत नाही. केवळ झेंडे लावून भारतावर प्रेम करायचे हे साफ चुकीचे आहे. भारतावर प्रेम करायचे असेल तर भारतातील प्रत्येक माणसावर तुम्हाला प्रेम करावे लागेल. देवेंद्र फडणवीस या माणसाने महाराष्ट्रातलं राजकारण नासवलं. महाराष्ट्रात एकदम अनपड असलेले व शाळेची कधीही पायरी न चढलेले गाडगे महाराजांनी दाखवून दिले आहे की, शाळेच्या शिक्षणाचा आणि चांगल्या वागणुकीचा संबंध नाही. शिक्षणाचा संबंध जर तात्विक विचार करण्याशी नसेल तर केवळ सुशिक्षित असून उपयोग नाही. असा टोला त्यांनी सुजय विखे यांना मारला. सुजय विखे हे खोटारडे पणाची भूमिका घेत आहे. एका महा खोटारड्या माणसाबरोबर राहुन त्यामुळे त्यांनी मतदारांची माफी मागावी.

अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना अ‍ॅड निशा शिवुरकर म्हणाल्या की, महागाईचा प्रचंड आग डोंब उसळला आहे, कामगार कायद्यांमध्ये बदल करून कामगारांना देशोधडीला लावले आहे . शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत असताना व 770 शेतकरी शहीद झालेल्या असतानाही जर त्यांच्या बाजूने संसदेत खासदार आवाज उठवणार नसतील तर ते नुसतेच सुशिक्षित असून काय उपयोग?. भारतीय जनता पार्टी ही बलात्कारी लोकांना अभय देणारी पार्टी आहे. त्यामुळे या केंद्र सरकारला सत्तेतून खाली खेचणे आवश्यक आहे.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात अ‍ॅड. श्याम आसावा म्हणाले, दहा वर्षात केवळ मागच्या सरकारांनी काय केले हे सांगण्यात घालवले. शहरांचे नाव बदलल्याने लोकांचे चालचरित्र, वागणूक बदलणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. 2500 पेक्षा जास्त महिलांचे लैगिंग शोषण करणारा प्रज्वल कुमार यास केवळ तो हिंदू असल्याने तथकतीत हिंदुत्वच्या प्रेमापोटी पाठीशी घातलं. त्याच्या ऐवजी जर एखादा मुस्लिम असलं तर त्याला तुडवून काढलं असतं.

या सभेची सुरुवात संध्या मेढे यांनी संविधान वाचनाने केली तर आभार प्रदर्शन भैरवनाथ वाकळे यांनी केले. कार्यक्रमात आनंद शितोळे यांनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर पुस्तकांबाबत मनोगत व्यक्त करताना लेखक आनंद शितोळे यांनी लोकांपर्यंत सरकारचा कारभार पोहोचत नसून आज माध्यमे सरकारच्या हातातील बाहुले बनल्याने लोकांपर्यंत खोटा व दिशाभूल करणारा प्रचार केंद्र सरकार करत असल्याने सत्य लोकांपर्यंत जाणे गरजेचे आहे व त्याकरता या पुस्तकांचे लिखाण करण्यात आलेले आहे असे सांगितले.

यावेळेस डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचा सन्मान करून स्वागत अशोक सब्बन यांनी केले, अँड असीम सरोदे यांचा सन्मान युनूस तांबटकर यांनी तर अ‍ॅड निशा शिवुरकर यांचा सन्मान अ‍ॅड संतोष गायकवाड यांनी केला.सभा यशस्वी करण्यासाठी संध्या मेढे, अशोक सब्बन, युनूस तांबटकर, अबिद शेख,  भैरवनाथ वाकळे, अँड संतोष गायकवाड अहमदनगर निर्भय चळवळीचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 


शेअर करा