
देशात चौथ्या टप्प्यातील मतदानाला 13 तारखेला सुरुवात झालेली असून नगर शहरात मतदान प्रक्रियेसाठी चक्क अल्पवयीन मुलांना जुंपण्याचा प्रकार समोर आलेला आहे. नगर शहरातील फकीरवाडा परिसरातील यशवंत माध्यमिक विद्यालय इथे इयत्ता नववीतील मुलाला स्वयंसेवक म्हणून कामाला जुंपण्यात आल्याची गंभीर बाब उघड झालेली आहे .
मतदान प्रक्रियेला आज सकाळी सुरुवात झाल्यानंतर प्रतिनिधीने फकीरवाडा परिसरातील यशवंत माध्यमिक विद्यालय येथे भेट दिली त्यावेळी नगर शहरातील ऑक्सिलियम शाळेत शिकत असलेला नववीमधील एक विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्यरत होता. विशेष बाब म्हणजे त्याच्या गळ्यात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिक्क्यासहित कार्ड देखील जोडलेले होते. प्रतिनिधीने अधिक विचारपूस केली त्यावेळी त्याने आपण ऑक्स्झिलियम शाळेत शिकत आहोत आणि सरांच्या सांगण्यावरून इथे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहोत अशी माहिती दिली.
संबंधित विद्यार्थ्यांने आमच्या वर्गातील इतरही काही विद्यार्थी वेगवेगळ्या शाळांमध्ये आज स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत अशी माहिती देत आपण इयत्ता नववीत शिकत आहोत असेही सांगितले. नववीत शिकत असलेला विद्यार्थी अल्पवयीन आहे त्यामुळे त्याला या प्रक्रियेत सहभागी कोणी करून घेतले असा प्रश्न प्रतिनिधीने संबंधित पोलीस अधिकाऱ्याला विचारला त्यावेळी त्यांच्याकडे कुठलेच उत्तर नव्हते. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासन प्रयत्नशीलअसल्याचा दावा करते मात्र याच निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी गंभीर नसण्याची देखील बाब या घटनेनंतर समोर आलेली आहे.