उत्कर्षाताई रुपवते यांनी बजावला मतदानाचा हक्क , मतदारांना केलं आवाहन की.. 

शेअर करा

लोकसभेसाठी आज राज्यात चौथा टप्प्यासाठी मतदान पार पडत असून शिर्डी लोकसभा वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा मतदान केंद्र क्रमांक 127 वर जाऊन त्यांनी मतदान केले आहे. लोकशाहीचा जागर  साजरा करण्यासाठी सर्व मतदार राजांनी मतदानासाठी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा असेही आव्हान उत्कर्षा रुपवते यांनी मतदारांना केले आहे . 

उत्कर्षाताई रूपवते यांच्यावर याआधी हल्ला झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, ‘ स्वातंत्र्यानंतर शिर्डी लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदाच एक महिला उमेदवार निवडणूक लढत आहे. गेल्या 20 वर्षात मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे, परंतु कधीही मला असा अनुभव आला नाही. पण आज शिर्डी लोकसभा निवडणूकीत एक सक्षम उमेदवार म्हणून माझे आव्हान उभे राहिले असल्याने माझ्यावर भ्याड हल्ला केला गेला आहे. हल्ला करणारे माझे विरोधकच आहेत हे सर्वांना माहिती आहे.

विरोधकांनी लक्षात ठेवावे,मी राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लेक असून निवडणुकीचे  मैदान काही सोडून जाणार नाही.इतर पक्षांप्रमाणे वंचित बहुजन आघाडी हा धनदांडग्यांचा पक्ष नाही. पण माझ्यामागे वांचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खंबीरपणे उभे आहेत. जनता माझ्यासोबत उभी आहे. या हल्ल्यामुळे माझा निर्धार दुपटीने वाढला आहे. आम्ही सर्वजण निवडणूक दुप्पट ताकदीने लढवू आणि जिंकून येऊ, असा विश्वास यावेळी उत्कर्षा रूपवते यांनी व्यक्त केला होता. 


शेअर करा