‘ साधा साधा माणूस ‘ की  ‘ मैं हू डॉन ‘ ? , दोघांत तिसरा आता विसरा 

शेअर करा

संपूर्ण देशभरात सध्या मतदारांचे मोठ्या प्रमाणात दोनच विचारसरणीत विभाजन झालेले असून तिसऱ्या पक्षांसाठी किंवा तिसऱ्या व्यक्तीसाठी सध्या बहुतांश ठिकाणी स्थान नसल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील तशीच परिस्थिती निर्माण झालेली असून प्रामुख्याने ही निवडणूक महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात कडवी टक्कर होणार असल्याचे संकेत आहेत. .. तिसऱ्या उमेदवारांसाठी या निवडणुकीत फारसे स्थान असल्याचे दिसून येत नाही. 

सुजय विखे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच पक्षांतर्गत धुसफूस सुरू झालेली होती त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले त्यानंतर मनधरणी करण्याच्या उद्देशाने सुजय विखे यांनी माफीदेखील मागितली तर दुसरीकडे निलेश लंके यांनी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीतील अनेक नेते यांना सोबत घेत एकजूट दाखवून दिली.  मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने ‘ सुजय विखे यांना फोन लावून काम केल्याची ऑडिओ क्लिप दाखवा आणि बक्षीस मिळवा ‘ अशी बातमी केली त्यानंतर या पदाधिकाऱ्याला पक्षातून काढण्यात आले त्यावरून भाजपला विरोध खपत नाही हे देखील बाब समोर आली. 

मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजपने सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले आणि ठिकठिकाणी रस्ते अडवत नागरिकांची गैरसोय करत उमेदवारीचा फॉर्म भरला तर दुसरीकडे निलेश लंके यांनी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरला. निलेश लंके यांच्या भाषणांचा सूर देखील आपण साधा माणूस आहोत असाच होता उलट सुजय विखे यांनी ‘ मै हु डॉन ‘ सारख्या गाण्यावर डान्स करत जणू काही आपण उमेदवार नव्हे तर डॉन आहोत असे भासवण्याचा प्रयत्न केला. 

आपण कुठल्याही पद्धतीने यंत्रणा फिरू शकतो असा अतिआत्मविश्वास असलेली विखे यांची यंत्रणा कार्यरत झाली मात्र तोपर्यंत लंके यांनी मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतलेली होती आणि पारनेर तालुक्यात वडझिरे इथे सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले. नगर शहरात देखील महायुतीतील गटांमध्येच धुसफुस असल्याचे समोर आले आणि त्याचे पर्यावसान माजी नगरसेवक सचिन जाधव यांना मारहाण करण्यात झाले. निलेश लंके यांनी त्यांची भेट घेऊन पक्षांतर्गत मतभेद असले तरी विरोधकांसाठी देखील आपण मदतीला धावून जातो असाही संदेश या निमित्ताने मतदारांना दिला . 

कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे हे सिद्ध करण्यासाठी निलेश लंके आणि सुजय विखे या दोन्ही उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस लागली पण यासाठी जबाबदार कोण हे न समजणे इतपत मतदारही भोळे नाहीत. निलेश लंके यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोरोना काळात केलेले काम तर दुसरीकडे सुजय विखे यांनी उड्डाणपूल निर्मितीच्या वेळी बजावलेली महत्त्वाची भूमिका तसेच प्रस्तावित एमआयडीसीची कामे देखील सुजय विखे यांच्या नावावर आहेतच..  

संपूर्ण देशांमध्येच सध्या शेतकरी बांधव , बेरोजगार , कष्टकरी समाज यांच्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि भाजप यांच्याविरोधात प्रचंड नाराजी असून त्याचा काही प्रमाणात फटका सुजय विखे यांना पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे सुजय विखे यांनी खासदार म्हणून काम करताना भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना देखील डावल्याचा राग काही प्रमाणात भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. काँग्रेसच्या विचारधारेतून आलेल्या विखे कुटुंबीयांनी भाजपसोबत जुळून घेतले मात्र तळागाळातील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांसोबत तितके मधुर संबंध त्यांना अद्यापही प्रस्थापित करण्यात यश आलेले नाही.


शेअर करा