
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खरमरीत टीका करताना शरद पवार यांनी , ‘ पंडित नेहरू स्वातंत्र्यासाठी तेरा वर्ष तुरुंगात राहिले. पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या इंदिरा गांधी यांचीही हत्या झाली. राजीव गांधी यांनी देखील देशासाठी बलिदान दिले. नेहरू गांधी कुटुंबीयांनी देशासाठी सर्वस्व दिले त्याच कुटुंबातील राहुल गांधींची तुम्ही टिंगल टवाळी करता तसेच तुम्ही देशासाठी काय योगदान दिले ?, ‘ असा खडा सवाल उपस्थित केला आहे.
पुणे इथे बोलताना शरद पवार म्हणाले की , ‘ जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांची संपूर्ण राज्यासाठी फक्त एकच सभा रेस कोर्सला झालेली होती मात्र आता एका राज्यात एका दिवशी अनेक ठिकाणी सभा घ्यायची वेळ पंतप्रधानांवर आलेली आहे आणि इतक्या सभा घेऊनही योग्य परिणाम होत नाही. शासनावर दबाव टाकून निवडणुकीचे निकाल वेगळे लागतील यासाठी खबरदारी म्हणून ते वारंवार सभा घेत आहेत का ?
शरद पवार पुढे म्हणाले की , ‘ भाजपकडे दहा वर्षे सत्ता होती मग आताही काँग्रेसवरच टीका का करता ?. महिलांचे दागिने मंगळसूत्र अशा विषयावर कुठलाही पक्ष बोललेला नाही . असत्य मुद्दे मांडून वैयक्तिक टीका करण्यावरच मोदींचा भर आहे. सत्तेचा अधिकारांचा गैरवापर हेच मोदींचे वैशिष्ट्य असून कोरोना काळात चांगले काम करूनही भाजपने शिवसेना राष्ट्रवादी फोडली आणि महाराष्ट्रातील व्यवसाय उद्योग गुजरातमध्ये पळवून गेले , ‘ असेही ते पुढे म्हणाले.