मराठा आरक्षण तसेच बँकेच्या थकीत कर्जामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव इथे वाळूज परिसरात एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केलेली आहे . मयत तरुणाचे वय 32 वर्षे असून मयत व्यक्ती याने यापूर्वीच माजलगाव इथे छत्रपती संभाजी महाराज चौकात सलग पाच दिवस मराठा आरक्षणासाठी उपोषण केलेले होते मात्र तरी आरक्षण मिळत नसल्याकारणाने तो नैराश्यात गेलेला होता तर दुसरीकडे खाजगी बँकेच्या थकीत कर्जामुळे देखील तो त्रस्त झालेला होता.
उपलब्ध माहितीनुसार , दत्ता कालिदास महिपाल ( राहणार शिंदेवाडी जिल्हा बीड ) असे आत्महत्या तरुणाचे नाव असून बारावी उत्तीर्ण झालेला दत्ता हा कामाच्या शोधात वाळूज एमआयडीसी परिसरात आलेला होता . वाळूजमध्ये आल्यानंतर एका ठिकाणी त्याला काम देखील मिळाले आणि खोलीमध्ये तो भाडेतत्त्वावर राहत होता.
त्याचा सहकारी असलेला एक व्यक्ती मंगळवारी रात्रपाळीला गेला होता त्यावेळी त्या व्यक्तीला दत्ता यांनी फोन करून ‘ एकीकडे घेतलेले कर्ज फिटत नाही म्हणून बँकेतून तगादा सुरू आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा ही प्रश्न मार्गी लागेना त्यामुळे कुठली संधी देखील मिळत नाही त्यामुळे मी आत्महत्या करत आहे ‘ असा मेसेज व्हाट्सअपवर टाकला. मित्राने त्यानंतर रूमवर दुसऱ्या एका व्यक्तीला पाठवले मात्र तोपर्यंत दत्ता याने टोकाचे पाऊल उचलले होते.