
नगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार राहुरी तालुक्यातील शिलेगाव इथे समोर आलेला आहे. एका तरुणाचा खून करून त्याचे हातपाय बांधून त्याचा मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता. प्रकरण समोर आल्यानंतर तीन जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यातील एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तर इतर दोन जण मात्र फरार आहेत.
उपलब्ध माहितीनुसार , राहुल रामदास जगधने ( वय 33 वर्ष राहणार शिलेगाव ) असे आरोपी अटक केलेल्या तरुणाचे नाव असून दिगंबर म्हसे आणि बापू तागड ( दोघेही राहणार शिलेगाव ) हे आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत . राहुल यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
विजय अण्णासाहेब जाधव ( वय तीस वर्ष राहणार आरडगाव ) याचा 14 तारखेला संध्याकाळी खून करण्यात आला आणि त्यानंतर आरोपींनी मृतदेह विहिरीत टाकून दिला असा त्यांच्यावर आरोप आहे. पंधरा तारखेला मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात करण्यात आलेली होती. एका आरोपीला अटक करण्यात आलेली असून खुनामागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.