उद्धव ठाकरे यांचे निवडणूक आयोगावर ताशेरे , मुद्दाम दिरंगाई केली जातेय कारण..

शेअर करा

मुंबईत मतदान कमी होत असल्याचे दिसून येत असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत . उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या ठिकाणी भेट देऊन निवडणूक आयोगाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करताना मतदारांनी कितीही उशीर झाला तरी मतदान करण्यासाठी आग्रही रहा असे आवाहन मतदारांना केले आहे . 

उद्धव ठाकरे म्हणाले की ? 

आज २० तारीख आहे. आपण अशावेळेला भेटतोय की महाराष्ट्राच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पुढच्या एक-दीड तासांमध्ये थांबणार आहे. मी सकाळपासून विविध भागांची माहिती घेत आहे. मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला दहा-दहा, बारा-पंधरा मेसेज जात आहेत की, मतदान करा म्हणून. त्याप्रमाणे मतदार उतरलेले दिसत आहेत. खूप गर्दी दिसत आहे पण निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय, असं स्पष्ट दिसतंय

मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे तथाकथिक प्रतिनिधी हे मतदान केंद्रात बसले आहेत, त्यांच्याकडून खूप दिरंगाई केली जात आहे. विशिष्ट वस्त्यांच्या ठिकाणी नावे दोन ते तीनवेळा तपासले जात आहेत. एकतर ज्येष्ठ मतदारांना आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप त्रास झालेला आहे. इतरही मतदारांना त्रास झालाय. यामध्ये महिला सुद्धा आहेत. कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही. पिण्याचं पाणी नाही. तरीदेखील मतदार रांगा लावून उभे आहेत. हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागत आहे . 

मला असं वाटतंय, मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा करतोय. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय. दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई मतं नोंदवताना केली जात आहे. मी नागरिकांना आवाहन करतोय, आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदानकेंद्रांमध्ये जावून उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सोडू नका. तुमचं मतदान केल्याशिवाय सोडू नका. तुमच्या मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका. 


शेअर करा