जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी घरात मृतावस्थेत आढळल्या : आकस्मिक की आत्महत्या ?

शेअर करा

ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख (वय ३८) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला. नगर शहरातील यशवंत कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानापासून जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात त्यांना नेले असता डॉक्टरांनी त्यांचा येथे येण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी नातेवाईकांना आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. Gauri Prashant Gadakh dies

तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, सायंकाळी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नियमानुसार याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येऊन पुढील तपास सुरू केला आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही मात्र आकस्मिक की आत्महत्या याची नगर शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गौरी या यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव प्रशांत यांच्या पत्नी होत तर राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी होत्या. गौरी यांचे माहेर लोणी (ता. राहाता) येथील आहे. त्या थेट राजकारणात सक्रीय नसल्या तरी पती प्रशांत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्या कार्यरत होत्या.


शेअर करा