
नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात आत्तापर्यंत अनेकजण गजाआड झालेले आहेत. नगर अर्बन बँकेच्या ठेवीदार तसेच कर्जदारांसाठी आता वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ देण्यास केंद्रीय सहकार निबंधक विभागाने परवानगी दिलेली असून बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा तसेच नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी यांच्यासोबत इतर जागृत सभासदांनी यासाठी पाठपुरावा केलेला होता.
नगर अर्बन बँकेमध्ये थकबाकी असलेल्या कर्जदारांना देखील यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याजोगी परिस्थिती असून तात्काळ थकबाकी जमा केली तर ठेविदारांच्या रकमा देखील परत करणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त कर्जदारांनी वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ घेऊन घ्यावा जेणेकरून फौजदारी कारवाईचा त्यांना सामना करावा लागणार नाही ,असे आवाहन राजेंद्र चोपडा यांनी केलेले आहे.
नगर अर्बन बँक कर्ज व्यवहार प्रकरणात घोटाळा सुमारे 291 कोटींचा असून काही संचालक आणि अधिकाऱ्यांनी केलेला गैरकारभार यामुळे रिझर्व बँकेने बँकेचा परवाना रद्द केलेला आहे . सद्य परिस्थितीत बँकेवर अवसायक यांची नियुक्ती असून कर्ज वसुलीला वेग मिळावा यासाठी केंद्रीय निबंध कार्यालयाकडे वन टाइम सेटलमेंट योजनेची मागणी करण्यात आलेली होती त्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. बँकेच्या कर्जदारांनी बँक अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून एक रकमी थकबाकी जमा केली तर भविष्यातील फौजदारी कारवाई टाळी जाऊ शकेल तसेच ठेवीदारांना देखील त्यांच्या हक्काची रक्कम देणे शक्य होणार आहे