‘ या उद्यापासून कामाला ‘ डोनाल्ड ट्रम्प यांना नगरपालिकेची कामाची ऑफर

शेअर करा

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हरल्यानंतर अमेरिकेचे मावळते अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या भविष्याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार चर्चा सुरु आहे. ट्रम्प आता काय निर्णय घेणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. डोनाल्ड ट्रम्प हे कोट्याधीश असून कुठेही जॉब करणार नाहीत तर त्यांचाच व्यवसाय पुढे वाढवतील अशी चर्चा असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांना जेरुसलेममधील नगरपालिकेने नोकरीची ऑफर देऊन खिजवले आहे. या ऑफरचीही सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर जेरुसलेम नगरपालिकेने म्हटलं आहे, “ट्रम्प यांनी काळजी करु नये. आमच्याकडे ट्रम्प यांची योग्यता असलेले आणि ते अर्ज करु शकतील अशी अनेक पदं रिक्त आहेत.” या नगरपालिकेने आपल्या फेसबुक पेजवर या नोकरीला अर्ज करायची लिंक शेअर केली आहे. तसेच त्यासोबत लिहिलं आहे, ‘डोनाल्ड जे. ट्रम्प तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. आमच्या जेरुसलेममधील नोकऱ्यांचा हा ‘जॉब बोर्ड’ दररोज नव्या संधीसह अपडेट होत राहिल.’ Municipal job offer to Donald Trump

मात्र ह्या पोस्टवरून सोशल मीडियात मोठे वादंग उठताच जेरुसलेम पालिकेने पेजवरील ही वादग्रस्त पोस्ट हटवली आहे . जेरुसलेम पोस्ट या वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार वादानंतर जेरुसलेम नगरपालिकेने तात्काळ ही पोस्ट डिलीट केली. नगरपालिकेच्या प्रवक्त्यांनी ही पोस्ट चुकीने पोस्ट झाल्याचं आणि हटवल्याचं म्हटलं आहे मात्र यामुळे सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात अमेरिकेच्या 70 वर्षांमधील परराष्ट्र धोरणाला गुंडाळत डिसेंबर 2017 मध्ये जेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती.दरम्यान अमेरिकेच्या निवडणुकीत जो बायडन यांचा विजय होत असताना दिसत असला तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र अद्यापही पराभव स्वीकारलेला नाही. त्यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत निकालाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं म्हटलंय.


शेअर करा