नगर शहरात महापालिका आयुक्त म्हणून देविदास पवार यांची नेमणूक करण्यात आलेली होती मात्र त्यानंतर काही तासात त्यात बदल करण्यात आला आणि यापूर्वी महापालिकेत उपायुक्त म्हणून काम केलेले यशवंत डांगे यांची महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली . अवघ्या काही तासांच्या आत असे निर्णय कोणाच्या आदेशावरून किंवा शिफारशीवरून ठरतात यांची चर्चा आता नगर शहरात सुरू झालेली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेले महापालिकेचे आधीचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे हे आमदार संग्राम जगताप यांच्या शिफारशीवरून आलेले होते. नगर शहरातील रस्त्यांची दुर्दशा, बनावट बनवलेले ऑडिट रिपोर्ट अन त्यासाठी अक्षरशः बनावट शिक्क्यांचा केलेला वापर या सर्व बाबीसमोर आल्यानंतर देखील पंकज जावळे यांनी त्यावर मौन बाळगलेले होते आणि कुठल्याही स्वरूपाची कारवाई केली नाही. काँग्रेस पक्ष सातत्याने नागरिकांच्या हक्कासाठी आक्रमक होता मात्र विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या आशीर्वादामुळे पंकज जावळे यांना एकाअर्थी अभय मिळालेले होते.
पंकज जावळे फरार झाल्यानंतर नवीन आयुक्त कोण येणार याची शहरात चर्चा सुरू होती आणि येणारा आयुक्त भ्रष्टाचार मुक्त असावा आणि शहरातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी त्यांनी पावले उचलावीत अशी अपेक्षा होती म्हणून देविदास पवार यांची नेमणूकही करण्यात आली मात्र काही तासांच्या आत ही नियुक्ती बदलण्यात आली आणि यशवंत डांगे यांची आता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यशवंत डांगे यांनी यापूर्वी महापालिकेत काम केलेले असून नगर शहरातील पंकज जावळे यांच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार झाकण्यासाठीच डांगे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे का ? अशीही शहरात चर्चा असून यशवंत डांगे हे निःपक्षपातीपणाने काम करतील की आयुक्त पंकज जावळे यांच्याप्रमाणे विशिष्ट राजकीय पुढाऱ्यांचे बाहुले म्हणून काम करतील हे त्या काळात पहावे लागेल.