कर्जत नगर पंचायत मधील बोगस कागदपत्राच्या आधारे शासकीय टेंडरचे काम पूर्ण करून ही बिल मिळत नसल्याचे प्रश्नावर वरिष्ठाकडे तक्रार करून ही प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याने उद्विग्न होऊन व हतबल होऊन आशिष बोरा यांनी आज दि ११ जुलै रोजी कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालयात पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
कर्जत येथील आशिष बोरा यांनी कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या व्हिडिओ चित्रीकरणाचे टेंडर घेतले होते. २०१५ व २०२१-२२ अशा दोन वेळच्या कामाचे पैसे न मिळाल्याने त्यांनी अनेकदा पत्र व्यवहार केलेला आहे. उपोषण केले आहे पण त्यातून न्याय मिळत नसल्याने दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने बोरा यांनी आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता.
आज सकाळी ११ वाजता बोरा यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या खुर्ची समोर ठिय्या देत आंदोलन सुरू केले. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, नगर पंचायतचे मुख्याधिकारी अजय साळवे हे जबाबदारी म्हणून ही उपस्थित नव्हते, कार्यालयीन शिरस्तेदार नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांनी सर्वाशी चर्चा केली. यावेळी दादा सोनमाळी, सुनील यादव, अभय बोरा, ॲड अशोक कोठारी, प्रसाद शहा, विजय खाटेर, भाऊसाहेब सुद्रिक, पत्रकार दत्ताजी उकिरडे, ॲड विजय सोनवणे, विश्वास रेनुकर, आशिष निंबोरे, अण्णा बागल, यश बोरा, राजेंद्र येवले, ढवाण, राजेंद्र घोडके, आदी सह अनेक जण उपस्थित होते.
दूरध्वनीद्वारे अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते व कोणतीही चौकशी करण्याचे आदेश न दिल्याने शेवटी आशिष बोरा यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले मात्र पोलिस कॉन्स्टेबल महादेव कोहोक, पो कॉ एल एस ढवळे व पो कॉ घोलवड व उपस्थित नागरिकांनी अडवत त्याच्या हातातील काडी पेटी ओढून काढली यामुळे पुढील अनर्थ टळला आहे .
आशिष बोरा यांनी नगर पंचायतच्या कागदपत्राची चौकशी करण्याची मागणी केली असताना वरिष्ठ प्रशासन कोणतीच कारवाई करत नसतील तर नागरिका पुढे कोणता पर्याय शिल्लक राहतो असा प्रश्न उपस्थित करत आपले काही बरे वाईट झाल्यास अधिकार असताना चौकशी न करता अधिकारी वर्गाला पाठीशी घालणाऱ्या जिल्हाधिकारी, नगर विकास विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना जबाबदार धरण्यात यावे असे आवाहन बोरा यांनी करताना संवेदनशिलता हरवलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या प्रेताची धग हवी असून उपस्थित नागरिकांनी या इंग्रज राजवटीसारख्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी आपल्यावर काडी टाकावी असे आवाहन केले. आशिष बोरा यांना पोलिसांनी कर्जत पोलिस स्टेशनला नेले असून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.