अभिनेते किरण माने यांनी निळू फुले यांच्याविषयी लिहिलेली पोस्ट जोरदार व्हायरल

शेअर करा

अभिनेते किरण माने यांनी निळू फुले यांच्याविषयी लिहिलेली पोस्ट जोरदार व्हायरल

मराठी चित्रपट सृष्टीतील ब्रँड म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते निळू फुले यांचा काल स्मृतिदिन होता. निळू फुले यांचे पडद्यावरील चरित्र आणि वैयक्तिक वागणे या दोन टोकाच्या भूमिका निळू फुले जगले. मोठ्या मनाचा माणूस म्हणून निळू फुले मराठी चित्रपटसृष्टीला परिचित आहेत. अभिनेते किरण माने यांनी निळू फुले यांच्याविषयी लिहिलेली पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. 

किरण माने यांनी लिहलेली काय आहे पोस्ट ? 

१९८० नंतरचा काळ… मायणीमधलं ‘गरवारे टूरींग टाॅकीज’. तंबू थेटरमध्ये ‘शनिमा’ बघताना घाबरुन आईला चिकटून बसलेला मी ! …कारन पडद्यावर ‘कर्रकर्रकर्र’ असा कोल्हापूरी चपलांचा आवाज करत ‘त्यानं’ एन्ट्री घेतलेली असायची.. बेरकी भेदक नजर – चालन्याबोलन्यात निव्वळ ‘माज’ – नीच हसनं… शेजारी बसलेल्या माझ्या गांवातल्या अडानी आया-बहिनी रागानं धुसफूसायला लागायच्या.. सगळीकडनं आवाज यायचा : “आला बया निळू फुल्या..! मुडदा बशिवला त्येचा. आता काय खरं न्हाय.”

…थेटरमधल्या शांततेला चिरत त्यो नादखुळा आवाज घुमायचा “बाई,आवो आपला सोत्ताचा यवडा वाडा आस्ताना तुमी त्या पडक्यात र्‍हानार? ह्यॅS नाय नाय नाय नाय बाईSS तुमाला तितं बगून आमाला हिकडं रातीला झोप न्हाय यायची वोS”
आग्ग्गाय्य्यायाया…अख्ख्या पब्लीकमध्ये तिरस्काराची एक लाट पसरायची…

१९९० नंतरचा काळ…काॅलेजला मायणीवरनं सातारला आलेला मी. अभिनयाकडं जरा सिरीयसली बघायला सुरूवात झालेली… जुन्या क्लासिक मराठी-हिंदी-इंग्रजी फिल्मस् पाहून ‘अभिनयवेड्या’ मित्रांशी तासन्तास चर्चा – ‘अभ्यास’… अशात एक दिवस ‘सिंहासन’ बघितला ! त्यात निळूभाऊंनी साकारलेला पत्रकार दिगू टिपणीस पाहून येडा झालो !! ‘सामना’ मधला हिंदूराव पाटील… ‘पिंजरा’ मधला परिस्थितीनं लोचट-लाचार बनवलेला तमासगीर..’एक होता विदूषक’ मधला सोंगाड्याच्या भूमिकेचं मर्म सांगणारा लोककलावंत…! आईशप्पथ !! केवढी अफाट रेंज !!! भारावलो. ‘सखाराम बाईंडर’ नाटक वाचल्यानंतर भाऊंनी सखाराम कसा साकारला असेल ते ‘इमॅजीन’ करायचो कायम. पुढं ते जेव्हा कधी भेटले, तेव्हा मी मुद्दाम ‘बाईंडर’चा विषय काढायचो आणि ‘जीवाचा कान’ करून त्यांना ऐकायचो.

…दूबेजींचं वर्कशाॅप केल्यानंतर निळूभाऊंच्या नाट्यसंस्थेनं निर्मिती केलेल्या एका कवितावाचनाच्या कार्यक्रमात मला सहभागी करून घेतलं गेलं. त्या निमित्तानं निळूभाऊंना जवळून पहाण्याचा योग आला. त्यानंतर बर्‍याच वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने गाठीभेटी,चर्चा होत राहिल्या…निळूभाऊ सातारच्या माझ्या घरीही आले… तास-दोन तास दिलखुलास गप्पा मारल्या… विनम्रता एवढी की, समोरच्या माणसाला संकोच वाटावा !

जो काही छोटासा सहवास लाभला त्यात या ‘महान’ अभिनेत्यानं ‘जगणं’ शिकवलं…कलाकाराला ‘भवतालाचं भान’ कसं असावं याचा आदर्श याची देही याची डोळा पाहिला… भाऊ, तुम्हाला जाऊन पंधरा वर्ष झाली ! पुणे-सातारा हायवेवर वेळेजवळ आजही तुमचा फोटो असलेलं होर्डींग झळकत असतं…त्यावर लिहीलंय : ‘मोठा माणूस’ ! किरण माने.


शेअर करा