वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची खाजगी ऑडी गाडी अखेर पुणे पोलिसांनी जप्त केली असून त्याआधी पूजा यांच्या आईने वाहतूक पोलिसांशी चांगलाच वाद घातला. रविवारी ही पूजा खेडकर यांच्या चालकाने स्वतःहून गाडी पुणे पोलिसात जमा केली.ऑडी मोटारीवर महाराष्ट्र शासन असे लिहिलेले होते शिवाय बेकायदेशीररित्या लाल दिवा देखील या ऑडी गाडीला लावण्यात आला होता.
सरकारी कार्यालयात येण्यासाठी पूजा खेडकर ही ऑडी गाडी वापरायच्या. पोलिसांनी मोटार पोलीस ठाण्यात हजर करावी यासाठी खेडकर यांना नोटीस बजावण्यासाठी वाहतूक पोलीस गेलेले असताना पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांसोबत देखील वाद घातलेला होता.
शासकीय नियमानुसार खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिता येत नाही मात्र सर्व नियम उधळून देत पूजा खेडकर यांनी हा प्रकार केलेला होता सोबतच आतापर्यंत तब्बल 21 वेळा वाहतूक नियमांचे देखील याच गाडीने उल्लंघन केले असल्याचे समोर आलेले आहे. पूजा खेडकर यांच्याकडील गाडी त्यांच्या ड्रायव्हरने रविवारी पहाटे चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात आणून जमा केलेली आहे.
पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे सेवानिवृत्त अधिकारी असून पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील ते रहिवासी आहेत. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळात उच्चस्तरीय पदावर ते यापूर्वी कार्यरत होते. निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी त्यांचे उत्पन्न सुमारे 40 कोटी असल्याचे त्यांनी निवडणूक प्रमाणपत्र देताना म्हटले होते मात्र पूजा खेडकर यांनी अशाही परिस्थितीत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळवले होते. खेडकर कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहत असून तिथे देखील त्यांनी पाथवेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी महापालिकेने त्यांना नोटीस बजावली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलीप खेडकर यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघा निवडणूक लढवली आणि त्यात त्यांना अवघी 13749 मते मिळाली. माय नेता डॉट इन्फो वेबसाईट वरील माहितीनुसार दिलीप खेडकर यांनी त्यांची वैयक्तिक संपत्ती 40 कोटी असल्याचे घोषित केले होते सोबतच लायबिलिटी शून्य असल्याचे देखील त्यांनी प्रमाणपत्रात म्हटलेले होते. दिलीप कोंडीबा खेडकर असे त्यांचे पूर्ण नाव आहे . 2021 – 2022 मध्ये त्यांनी उत्पन्न तेरा लाख ५८ हजार दाखवले तर 2022 – 2023 मध्ये तिपटीपेक्षा जास्त वाढ होऊन त्यांचे उत्पन्न ४३ लाख ५९ हजार झाले.
पूजा खेडकर यांनी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असून पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून ट्रेनिंगसाठी त्यांची नियुक्ती झाली होती मात्र त्यानंतर खाजगी वाहनावर लाल दिवा लावणे , भारत सरकारचे स्टीकर लावणे असे अनेक प्रकार त्यांनी केले. पूजा खेडकर यांना सध्या यांची सध्या वाशिममध्ये नियुक्ती झालेली आहे . पूजा खेडकर यांना देण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र देखील वादात सापडलेले असून मानसिक आजार असलेल्या व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर राहत असेल तर ही बाब देखील महागंभीर आहे.