
पूजा खेडकर प्रकरणात आमदार पंकजा मुंडे यांचा कुठलाही सहभाग नाही. मुंडे यांच्या कुटुंबीयांना जाणीवपूर्वक ट्रोल केले जात आहे असा आरोप मोनिकाताई राजळे यांनी केलेला आहे.
मोनिकाताई राजळे यांनी एक प्रसिद्धीपत्रक दिलेले असून त्यामध्ये म्हटले आहे की , ‘ काही लोक मुंडे यांच्याविषयी खोट्या बातम्या प्रसिद्धीस आणून त्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. खेडकर कुटुंबीयांनी मुंडे यांना बारा लाखाचा चेक दिला आणि मुंडे यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून मोहटादेवीच्या चरणावर चांदीचा मुकुट अर्पण केला अशा या बातम्या आहेत.
मोनिकाताईंनी पुढे म्हटले आहे की , ‘ सदर बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसून जीएसटी आणि कराच्या संदर्भात नोटीस आल्यानंतर काही जणांनी पंकजा मुंडे यांना सुखदुःखात सहभागी होण्याच्या उद्देशाने आम्ही तुम्हाला मदत करणार असे सांगत काही चेक पाठवलेले होते. मुंडे कुटुंबियांनी हे चेक स्वीकारले नाहीत. पंकजा मुंडे या मोहटा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या होत्या त्यावेळी पूजा खेडकर हिचे वडील पंकजा मुंडे यांच्याकडे आले आणि तुम्हाला लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मी देवीला चांदीचा मुकुट अर्पण करणार असल्याचा नवस केला होता त्यानुसार मी तो मुकुट अर्पण करत आहे असे सांगितले.
वास्तविक या सर्व प्रकाराची पंकजा मुंडे यांना कुठलीच कल्पना नव्हती मात्र विनाकारण मुंडे कुटुंबीयांना अडचणीत आणण्याचे प्रकार काही विघ्नसंतोषी लोकांकडून सुरू आहेत. राजकीय विद्वेषातून पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्यात येत आहे. विरोधकांच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही ,’ असे मोनिकाताई यांनी या पत्रात म्हटलेले आहे.