खासदार निलेश लंके यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होत असून ऐन पावसाळ्यात डीएसपी चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.निलेश लंके यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रभरातून विविध कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत असून नेहमी गर्दी असलेल्या डीएसपी चौकात ट्राफिक जामचा देखील सामना नगरकरांना करावा लागत आहे. खासदार निलेश लंके यांनी नगर शहरात शेतकरी प्रश्नासाठी यापूर्वी आंदोलन केले त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ट्रॅक्टर उतरल्याने वाहतुकीची कोंडी झालेली होती.
नगरचे खासदार निलेश लंके यांनी , ‘ नगर शहरात ताबामारीचे प्रकार वाढलेले असून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नगरचा बिहार झालेला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची तात्काळ बदली करावी तसेच अवैध व्यवसाय बंद झाल्याशिवाय आता माघार घेणार नाही ,’ असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात दिलेला आहे. आंदोलन करू नको म्हणून 5 कोटी रुपये आणि महिन्याला पॅकेज देतो अशी ऑफर देण्यात आल्याचे लंके यांनी सांगत निलेश लंके मॅनेज होणाऱ्यापैकी नाही असे म्हटलेले आहे
22 तारखेला निलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केलेली असून भ्रष्टाचाराची मडकी घेऊन उपोषणकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आंदोलनाला सुरुवात केलेली होती. माजी महापौर भगवान फुलसौन्दर, अभिषेक कळमकर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे , विक्रम राठोड , दिलीप सातपुते, युवराज गाडे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेले होते.
निलेश लंके यांच्यासोबत असलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी कोतवाली तोफखाना आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे. बिंगो जुगार , दुचाकी चोरी , मंगळसूत्र चोरी , घरफोड्या अशा घटना वाढलेल्या आहेत मात्र अवैध धंदेवाल्या व्यक्तींना पोलिसांकडून अभय दिले जात आहे आणि रात्री बारानंतर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत असा देखील आरोप केलेला आहे.
निलेश लंके यांच्या आंदोलनाला अनेक व्यावसायिकांचा देखील पाठिंबा मिळत असून त्यामध्ये सुवर्णकार संघटनेचे देखील काही कार्यकर्ते सहभागी झालेले होते त्यावेळी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कामाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत एक तोळ्याची रिकव्हरी असेल तर त्यांच्याकडून तब्बल दहा तोळे वसूल केले जातात असा देखील खळबळजनक असा आरोप केलेला आहे. निलेश लंके यांच्यासोबत असलेल्या आंदोलकांनी आमच्या आंदोलनात साधे पोलीस घुसवून आंदोलन बदनाम करण्याचा देखील प्रयत्न केला जाऊ शकतो असाही आरोप केला आहे.