राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव येथे बोलताना ,’ राज्य सरकार सध्या घोषणाबाजीत बुडालेले आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि घोषणांचा पाऊस सरकार पाडत आहे. महायुतीचे सरकार भेदरलेले असून आता सत्तेत येण्यासाठी कपडे काढायलाही मागेपुढे पाहणार नाहीत ,’ असे म्हटलेले आहे.
जयंत पाटील म्हणाले की , ‘ सरकारची माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी नाही तर सरकार टिकवून ठेवण्यासाठी आहे. महाराष्ट्रावर सात लाख कोटींचे कर्ज आहे आता पुन्हा एक लाख दहा हजार कोटींचे कर्ज राज्य सरकार काढत आहे. कर्ज काढून घोषणांचा पाऊस सरकार पाडत असून त्याचा बोजा अखेर आपल्यावर येणार आहे.’
जयंत पाटील पुढे म्हणाले की ,’ केळी उत्पादक शेतकरी राज्य सरकारवर नाराज आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात नाही. पीक विम्याचे पैसे देखील मिळत नाहीत. कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात महायुतीने अश्रू आणले. गेल्या पाच महिन्यात १०७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत तर दुसरीकडे राज्यात बेरोजगारीचा दर 9% वरून 18 टक्क्यांवर गेलेला आहे . गरीब कुटुंबातील मुले परीक्षा देतात मात्र पेपर फुटत असल्याने त्यांचे वर्ष वाया जात आहे ,’ असे देखील यावेळी म्हणाले .