अहमदनगर येथील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झालेली असून तारकपूर बस स्टॅन्डपासून तर अहमदनगर तहसील कार्यालयापर्यंत अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यात खडी वाहून गेल्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. प्रसिद्धी लोलुप आमदार संग्राम जगताप यांचे शहरातील रस्त्यांकडे प्रचंड दुर्लक्ष झालेले आहे .
प्रोफेसर कॉलनी आणि झोपडी कॅन्टीन परिसरात तोफखाना पोलीस स्टेशन , तहसील कार्यालय, आकाशवाणी केंद्र , अनेक खाजगी क्लासेस ,हॉस्पिटल तसेच सेतू कार्यालय आहेत. वेगवेगळ्या कामानिमित्त तालुकास्तरावरून लोक इथे रोज येत असतात मात्र रस्त्याची परिस्थिती पाहता नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरला आले त्यावेळी तारकपूर ते तोफखाना पोलीस स्टेशनपर्यंतच्या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली होती मात्र त्यानंतर काही दिवसांच्या पावसाने झालेल्या कामाची पोलखोल झालेली आहे.