नगर शहरातील सावेडी परिसरातील प्रोफेसर कॉलनीजवळ असलेल्या दिनू भाऊ कुलकर्णी क्रीडा मैदानाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली असून या झाडांच्या मधूनच चक्क विद्युत पुरवठा करणाऱ्या जुन्या लाईन गेलेल्या आहेत त्यामुळे एखाद्या दिवशी शॉर्टसर्किट किंवा शॉक लागून अपघात होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
नगर शहरात आधीच उद्यानांची कमी असल्याकारणाने दिनू भाऊ कुलकर्णी क्रीडा मैदानात मोठ्या प्रमाणात नागरिकांची तसेच लहान मुलांची खेळण्यासाठी गर्दी असते. क्रिकेटचे क्लासेस , खो-खो क्लासेस तसेच वॉकिंगसाठी देखील इथे मोठ्या प्रमाणात नागरिक रोज येतात. मैदानाच्या उत्तरेकडील बाजूला असलेल्या प्रवेशद्वाराजवळ दोन इलेक्ट्रिसिटीच्या डीपी आहेत. विशेष बाब म्हणजे या दोन्ही डीपीला जोडणारी लाईन ही चक्क तीन ते चार झाडांच्या मधून गेलेली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या इलेक्ट्रिसिटी लाईनला कुठल्याही पद्धतीचे पाईप टाकण्यात आलेले नाहीत त्यामुळे काही ठिकाणी ह्या इलेक्ट्रिक तारा झाडाला घासत असून त्यामुळे शॉक लागून अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे.लहान मुलांचा देखील मोठ्या प्रमाणात वावर या परिसरात असल्याकारणाने एखाद्या दिवशी दुर्घटना होण्याच्या आधी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.