शनिवारी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते, शहराचे आ. संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर शहरामध्ये तीन उड्डाणपूलांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ हे देखील उपस्थित होते.
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे की, सदर उड्डाणपुलाच्या कामांची निविदाच अद्याप पर्यंत प्रकाशित झालेली नाही. त्यामुळे या कामाची कुठलाही वर्क ऑर्डर नाही. असे असतानाही कामाचा शुभारंभ करणे म्हणजे नगरकर जनतेची दिशाभूल करत फसवणूक करणे सल्याचा गंभीर आरोप काळे यांनी केला आहे. याबाबत काळे यांनी राज्याच्या मुख्य सचिव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे.
किरण काळे यांनी मंत्रालय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या सा.बां. विभागा अंतर्गत निधी मंजूर झाल्याचे सांगत नगर शहरातील डीएसपी चौक, नागपूर एमआयडीसी जवळील सह्याद्री आणि सन फार्मा चौकाजवळ आशा तीन दुपदरी उड्डाण पुलांच्या कामांचा शुभारंभ शनिवार दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आला. याबाबत अधिक माहिती घेतली असता असे समजले की सदर तीनही उड्डाण पुलांच्या कामाची निविदा अद्याप पर्यंत प्रकाशित झालेली नाही. सदर काम त्यामुळे कोणालाही ॲलॉट झालेले नाही. तसेच या कामाचा त्यामुळे कार्यारंभ आदेश देखील देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
किरण काळेंनी पुढे म्हटले आहे की, असे असताना देखील केवळ सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत विकास कामे सुरू केल्याचा बनाव या माध्यमातून रचला असल्याचे धक्कादायक आहे. यामध्ये राजकीय व्यक्तींबरोबरच प्रशासनाचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यासारख्या आयएएस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती आणि सहभाग असणे हे अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे आम्ही तमाम फसवणूक झालेल्या नगरकर जनतेच्या व काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य शासनाकडे मागणी केली आहे की, अशा पद्धतीने जनतेची दिशाभूल करणाऱ्या कृत्याबद्दल जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालय स्तरावरून चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.
किरण काळे म्हणाले की, राहिला प्रश्न पालकमंत्री आणि शहराच्या आमदारांचा. राजकीय जीवनात वावरत असताना जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला निवडून दिलेले असते तेव्हा त्यांनी जनतेची अशा पद्धतीने दिशाभूल करणे हे नैतिकदृष्ट्या अत्यंत गैर असून आता यांच्यावर कारवाई आता निवडणुकीच्या रणांगणात जनताच करेल.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर तीनही उड्डाण पूलांच्या कामांच्या निविदा तातडीने प्रकाशित करून योग्य ते सर्व प्रशासकीय मंजुरीचे सोपस्कार पूर्ण करून, चांगलं रेपुटेशन असणाऱ्या कंत्राटदारालाच हे काम जाईल याबाबतची सर्वतोपरी खबरदारी घेत लवकरात लवकर प्रत्यक्ष खऱ्यखुऱ्या कामाला सुरुवात करावी आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय शासनाच्या माध्यमातून होणार नाही, काम निकृष्ट दर्जाचे होणार नाही, यात दमडीचा ही भ्रष्टाचार होणार नाही याबद्दलची योग्य ती काळजी प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरावरून घेण्यात यावी अशी मागणी किरण काळे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केले आहे.
किरण काळे यांनी शुभारंभ झालेल्या कार्यक्रम स्थळावरून फेसबुक लाईव्ह करत नेटकऱ्यांसमोर या विषयाला वाचा फोडली. यावेळी काळे म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शहराच्या आमदारांनी आयटी पार्क उभारत शहरातील हजारो तरुणांना रोजगार देत असल्याचा बनाव रचला होता. त्याचा भांडा फोड आम्ही केला. आता या निवडणुकीच्या तोंडावर देखील उड्डाणपूलांच्या बाबतीत अशाच प्रकारे दिशाभूल करत जनतेला भुलविण्याचे काम सुरू आहे. मात्र नगरकर अशा गोष्टींना भूलणार नाहीत असे काळे यांनी म्हटले आहे.