नगर शहरातील रामवाडी परिसरात कामगार हॉस्पिटलची मागणी कारण..

शेअर करा

नगर शहरातील सर्जेपुरा परिसरातील रामवाडी इथे अनेक कचरावेचक , कष्टकरी आणि कामगार व्यक्ती राहतात त्यामुळे कामगार वर्गासाठी पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत कामगार हॉस्पिटलची उभारणी करण्याची मागणी कागद , काच पत्रा आणि कष्टकरी पंचायतीच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे करण्यात आली आहे. 

कष्टकरी पंचायतीचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे यांनी या प्रकरणी यासाठी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिलेले असून निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे ,’ नगर शहरातील रामवाडी झोपडपट्टी सर्वात जुनी आणि मोठी झोपडपट्टी आहे. सात ते आठ हजार लोकसंख्या या परिसरात असून मोठ्या प्रमाणात कचरावेचक कामगार बांधव इथे राहतात. कचराकुंडी आणि बाजारपेठ येथील कचरा जमा करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. महागाईच्या काळात तुटपुंज वेतन पुरत नसल्याने आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे . 

सद्य परिस्थितीत पावसाळा सुरू असल्याने शहरात अनेक लहान मोठ्या आजारांच्या साथी आलेल्या आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा दुर्लक्ष केल्याने छोट्या आजाराचे मोठ्या आजारात रूपांतर होते आणि अनेक जणांना प्राणही गमवावे लागतात त्यामुळे कामगार हॉस्पिटलची उभारणी करण्यात यावी ,’ असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे . 


शेअर करा