काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला हे सोमवारी शिर्डी दौऱ्यावर आले होते. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी चेन्नीथला यांचे स्वागत केले. यानंतर चेन्नीथला यांनी साई मंदिरात जात समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी काळे यांच्यासह आ. लहू कानडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, घनश्याम शेलार, प्रभावती घोगरे, नगर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, केडगाव काँग्रेसचे किशोर कोतकर, अशोक कानडे जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, शिर्डी संस्थांनचे माजी विश्वस्त सचिन गुजर, स्वप्निल पाठक, शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, प्रशांत दरेकर आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी काळे यांनी नगर शहरात थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या सुरू असणाऱ्या संघटनात्मक कामांचा आढावा चेन्नीथला यांना सादर केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षांच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यात बजावलेल्या उत्तम कामगिरीबद्दल चेन्नीथला यांनी अभिनंदन केले. अशाच प्रकारचे चांगले काम येत्या विधानसभा निवडणूक काळात देखील शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन चेन्नीथला यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.
यावेळी रमेश चेन्नीथला यांना संघटनात्मक अहवाल सादर करताना किरण काळे म्हणाले की, शहरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मजबूत संघटन उभे केले आहे. आगामी विधानसभा, महानगरपालिका निवडणुकीत पक्ष सत्तेत यावा यासाठी जोरदार काम काँग्रेस कार्यकर्ते करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी चेन्नीथला यांना दिला.