भाजप कार्यकर्ते आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या जवळचे कार्यकर्ते असलेले विजय औटी यांच्यावर सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे असताना त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे. महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी एकवटल्यामुळे अखेर प्रशासनाला पोलीस बंदोबस्तात विजय औटी यांना पारनेरला घेऊन जावे लागले .
विजय औटी हा खासदार निलेश लंके यांचे जवळचे कार्यकर्ते राहुल झावरे मारहाण प्रकरणातील आरोपी आहे. राहुल झावरे यांना मारहाण करण्यात आल्यानंतर विजय औटी याचे नाव समोर आले त्यामुळे कुणाच्या तरी मूक संमतीने सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांना घेरण्याचा हा नवीन प्रकार सुरू आहे का ? असाही प्रश्न यामुळे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
खासदार निलेश लंके आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यात निवडणूक प्रचाराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले आणि एकमेकांच्या कार्यकर्त्यांना दमदाटीपासून जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत प्रकार घडले. खासदारकीच्या निवडणुकीत निलेश लंके यांनी बाजी मारली मात्र त्यानंतर बदला म्हणून सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने निशाणा साधण्यात येत आहे का ? असाही प्रश्न यामुळे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
सिविल हॉस्पिटलमधून आरोपींचे पलायन ही काही नवीन बाब राहिलेली नाही यापूर्वी देखील कधी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन तर कधी प्रशासकीय अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन आरोपी फरार झालेले आहेत. तुरुंगवास टाळण्यासाठी डॉक्टरांचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारे सिविल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन जायचे अशी प्रथा सध्या नगरमध्ये रुजलेली पाहायला मिळत असून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये विजय औटी हे फोनवर बोलताना आढळून आलेले होते मात्र सिविल हॉस्पिटलमध्ये त्यांची बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी कडून करण्यात येत आहे.