देशात एक खळबळजनक असे प्रकरण हैदराबाद इथे समोर आलेले असून बँक गैरव्यवहार प्रकरणात तब्बल वीस वर्षांपासून फरार झालेला आणि कागदोपत्री मयत असलेला व्यक्ती तामिळनाडू इथे पकडण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , व्ही चलापती राव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सीबीआयने 2002 मध्ये त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला होता. हैदराबादमधील स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम करत असताना त्याने बनावट कोटेशन तयार करून बँकांची तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक केलेली होती.
त्याच्या विरोधात 31 डिसेंबर 2004 रोजी आरोपपत्रे दाखल करण्यात आली त्यानंतर तो आणि त्याची पत्नी काही दिवस फरार झाले त्यानंतर पत्नीने आपल्या पतीला मयत घोषित करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने देखील सात वर्षांनंतर सापडत नसल्याने त्याला मयत घोषित केले मात्र तो तामिळनाडूमध्ये बनावट आधार कार्ड त्याने बनवले आणि त्यानंतर तो तपास यंत्रणांना गुंगारा देत होता.
आरोपीने विनीत कुमार नावाने एक बनावट आधार कार्ड बनवले होते आणि त्यानंतर दुसऱ्या एका महिलेसोबत विवाह देखील केला. पहिल्या पत्नीच्या देखील तो संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती सीबीआयला मिळाली त्यानंतर सीबीआय त्याच्या मार्गावर होती.
2014 ला तो भोपाळला गेला त्यानंतर तो उत्तराखंडमध्ये गेला आणि 2016 मधील महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरजवळील वेरूळ येथील एका आश्रमात देखील गेलेला होता तिथे तो स्वामी म्हणून परिचित झाला आणि याच नावाने त्याने आधार कार्ड बनवून आश्रमात 70 लाखांची फसवणूक केली. तब्बल दहा वेळा मोबाईल नंबर बदलून श्रीलंकेला देखील पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला मात्र अखेर त्याला अटक करण्यात आलेली आहे.