शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बांगलादेशच्या प्रश्नावर वक्तव्य करताना ‘ बांगलादेशात लोकशाही तत्त्वाच्या आडून हुकूमशाही चालवण्यात आली आणि त्यामुळे देशाच्या माजी पंतप्रधान हसीना शेख यांना पलायन करून भारतात आश्रय घ्यावा लागला. भारतातील नेत्यांनी या घटनेचा धडा घ्यावा ,’ असा टोला हाणलेला आहे.
शेख हसीना भारतात आल्यानंतर आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतलेली नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी शेख हसीना यांची भेट घेतली मात्र भारताची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही त्यामुळे बांगलादेश प्रकरणावर आपली देशाची काय भूमिका आहे ही मोदी यांनी स्पष्ट करावी अशी देखील मागणी राऊत यांनी केलेली आहे.
देशाची आत्ताची परिस्थिती पाहता भारताचे सर्व जवळचे मित्र सध्या दुरावलेले दिसून येत आहेत सोबतच भारताच्या शेजारील देशांमध्ये सातत्याने अस्थिर परिस्थिती ही भारताची चिंता वाढवणारी ठरत आहे तर दुसरीकडे या देशांमध्ये चीनचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधाबद्दल वेगळे काही लिहावे अशी परिस्थिती नाही . श्रीलंकेत कोरोनानंतर 2022 मध्ये जे काही घडले ते अत्यंत धक्कादायक होते. सरकारी वाहनांना चालवण्यासाठी पेट्रोल डिझेल शिल्लक राहिले नाही ,अन्नधान्याची अडचण निर्माण झाली आणि त्यानंतर श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना देशातून पळ काढावा लागला.
म्यानमारमध्ये देखील 2021 मध्ये जनतेने निवडून दिलेले सरकार सैन्याने उलथून लावले आणि त्यानंतर म्यानमार देखील लष्करी सत्तेच्या विळख्यात अडकलेला आहे. दुसरीकडे नेपाळमध्ये चीनचा वाढता प्रभाव हा देखील भारतासाठी धोक्याची घंटा असून भारताच्या परराष्ट्र धोरणाची आता खरी कसोटी लागणार आहे. अफगाणिस्तानमध्ये देखील सध्या तालिबानची सत्ता आहे तर मालदीवमध्ये देखील भारत विरोधकच सत्तेत आहेत. सध्या परिस्थितीत फक्त भूतान हा एकच देश भारताच्या बाजूने दिसून येत आहे.