संशयास्पद परिस्थितीत चाललेली रिक्षा धरताच रिक्षात सापडला ‘ कुबेराचा खजिना ‘

शेअर करा

पेट्रोलिंग सुरु असताना एक संशयास्पद परिस्थितीत चाललेली रिक्षा पोलीस कर्मचाऱ्यांना आढळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडून रिक्षाची झडती घेतली असता तब्बल ५६ लाख रुपयांचे सुमारे एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने त्या रिक्षात सापडले. बातमी नगर शहरातील असून या रिक्षाचालकास अटक करण्यात आली आहे . संशयास्पदरित्या रिक्षामध्ये तब्बल ५६ लाख ८९ हजार ६९० रुपये किंमतीचे १ किलो ३६८ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असणारा रिक्षाचालक फैरोज रफिक पठाण (रा. बाबा बंगाली घर नंबर ७१६, नगर) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये कडक सुरक्षा उपाययोजना केलेली असल्याने मार्गदर्शक सुचना प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी सोमवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची ऑटो रिक्षा नगरच्या बाबा बंगाली परिसरात संशयास्पद रित्या फिरत असतांना पोलिसांना दिसून आली. रिक्षा थांबवून संबंधित रिक्षा चालकाकडे विचारपूस करीत असताना रिक्षा चालक पळून जाऊ लागला मात्र कर्मचाऱ्यांनी त्यास पकडले आणि चौकशी सुरु केली.

चौकशीदरम्यान याने त्याचे नाव फैरोज रफीक पठाण असे सांगितले आणि त्यानंतर रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे ५६ लाख ८९ हजार ६९० रुपये किंमतीचे सोन्याचे १ किलो ३६८ ग्रॅम वजनाचे दागिने मिळून आले. रिक्षा चालकाकडे या दागिन्यांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच दागिन्यांच्या मालकी हक्काबाबत त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाहीत. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून फैरोज रफीक पठाण याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, ही दागिन्याची बॅग नगरच्या गंजबाजार येथील परिसरात सापडली असल्याची माहिती त्याने दिली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.


शेअर करा